राधानगरी-भुदरगड तालुक्याचे आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोरांच्या गटात सामील झाल्याने त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोर्चा काढुन निषेध केला आहे. बारवे-दिंडेवाडी येथील धरणप्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होऊ देणार नाही, असे सांगत कोल्हापुरातील शिवसेनेने बंडखोरांविरोधात थेट सामना होणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले.
शिवसेनेला पुन्हा बळकटी आणण्यासाठी कडवट शिवसैनिक जोमाने एकवटत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचा ताकदवान जिल्हा म्हणून कोल्हापूरची पुन्हा एकदा ओळख करून दाखवू, अशी ग्वाही शिवसेना सहसंपर्कप्रमुख, खासदार संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेतून बाहेर पडलेले बेन्टेक्स होते; उरलेत ते लखलखीत सोने आहे, अशी टिपणी त्यांनी केली. यावेळी सर्व जिल्हाप्रमुख संजय पवार,नवे शहरप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
गुरुवारी निर्णायक मेळावा –
१४ जुलै रोजी शाहु स्मारक भवन येथे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व दक्षिण मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेशी गद्दारी करणारे, स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणा-यांचा ही समाचार घेण्यात येणार असून त्यांच्याविषयी निर्णायक भुमिका ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नव्या शाखा,नवी कार्यकारिणी –
महानगरपालिका क्षेत्रातील शहर व दक्षिण मतदारसंघातील यापुर्वीच्या सर्व शिवसेना शाखा व जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहेत. १५ ऑगस्ट पुर्वी याची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. ऑगस्ट अखेर २१ हजार सदस्य नोंदणी पुर्ण करण्यासह अंगीकृत सर्व संघटनांचीही पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. पक्षविरोधी कारवाई प्रकरणी युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले.