नळपाणी योजना रखडल्याचा निषेध

कोल्हापूर : कुरुंदवाड पालिकेच्या रखडलेल्या नळपाणीपुरवठा योजना प्रश्नी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आणि नगराध्यक्षांच्या समोर शिवसेनेचे शहरप्रमुख राजू आवळे, जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब भोसले यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा गुरुवारी प्रयत्न केला. यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून, परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले होते.

कुरुंदवाड पालिकेच्या नव्या नळपाणीपुरवठा योजनेचे काम रखडले आहे. संबंधित ठेकेदाराबाबत निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी आघाडीने कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन पोकळ ठरल्याने त्याचा निषेधार्थ आज माजी नगरसेवक राजू आवळे, आप्पासाहेब भोसले, राजेंद्र बेले, संतोष नरके, सुहास पासोबा यांच्यासह शिवसैनिकांचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले होते.

शिवसैनिकांनी मुतकेकर व पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत धारेवर धरले. नगराध्यक्ष सत्ताधारी व विरोधी सर्वच नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. त्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने संतप्त झालेले आवळे व भोसले यांनी मुख्याधिकारी दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातील आगपेटी काढून घेत त्यांना रोखले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पालिका परिसर दणाणून सोडले. मुतकेकर यांनी माहिती दिल्यानंतर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, उपनिरीक्षक प्रेम केदार पालिकेत दाखल झाले. निर्णय दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही,  नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनाही हलू देणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले.

नगराध्यक्ष पाटील यांनी शिवसैनिकांना ५ मार्च रोजी विशेष सभा घेऊन या सभेत पाणीपुरवठय़ाबाबत कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेऊ , असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Story img Loader