राज्य शासनाकडून गुणवत्तापूर्ण कामाचा आग्रह सातत्याने धरला जात असला तरी त्यातील फोलपणा गुरुवारी सत्तेतील घटक असलेल्या शिवसेनेने पाणलोट विकास कार्यक्रमातील बंधाऱ्याच्या निकृष्ट कामाद्वारे चव्हाटय़ावर आणला. गडिहग्लज तालुक्यातील सर्व ४८ बंधारे अत्यंत खराब पद्धतीने बांधले असल्याने मक्तेदाराने सरकारी पशाची लूट केल्याचा आरोप जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्याशी बोलताना केला. यातील एक बंधारा पहिल्या पावसातच खराब झाल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येईल, असे पत्र मास्तोळी यांनी देवणे यांना दिले.
गडिहग्लज तालुक्यात पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ४८ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापकी अर्जुनवाडा, महागाव, नरेवाडी, हरळी, हदलगे, हसूर आदी १७ गावांतील बंधारे अत्यंत निकृष्ट झाले आहेत. उर्वरित बंधारेही कामचलाऊ पद्धतीने बांधले आहेत. अस्तरीकरण करून बंधारे मजबूत करण्याच्या कामाला फाटा दिला आहे. शेती पाण्यासाठी बंधारे बांधण्याचा हेतू सफल झालेला नाही. बंधारे बांधताना पाया घालण्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले असल्याने बंधारे पावसाच्या पाण्याने वाहून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. पहिल्या पावसाने एका बंधाऱ्याचे खरे स्वरूप उघड झाल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे. तालुका कृषी अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमत करून सरकारी पशाची लूट झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये बळावली आहे.
त्यामुळे आज जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांच्याशी बोलताना शेतकरी व शिवसेनेने या प्रकाराविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या. सदर कामाची चौकशी सक्षम अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत करावी, त्याचा अहवाल राज्याच्या सचिवांना पाठवावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Story img Loader