कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे – ठाकरे गट अशी विभागणी झाल्यानंतर शिवसेना आणि ठाकरे गट कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकत्रित सामोरे जाणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यांच्या शिव शाहू आघाडी सोबत भाजप, राष्ट्रवादीचा एक गट, रिपाई यांचाही समावेश आहे.
कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे यांनी घेतला होता. समाधानकारक जागा न मिळाल्याने ठाकरे गटाने या आघाडीला जय महाराष्ट्र करून नव्याने सत्तासंग केला. आज झालेल्या घडामोडीमध्ये वरील सर्व पक्ष एकत्रित आले असल्याची घोषणा करण्यात आली.
हेही वाचा >>> सांगली बाजार समितीसाठी महाविकास आघाडी- भाजप यांच्यात लढत
आघाडीचे नेतृत्व
त्याची मोट बांधण्याचे काम खासदार धनंजय महाडिक, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरूडकर हे तीन माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, प्रा. जयंत पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, रिपाईचे उत्तम कांबळे यांनी केले आहे. उद्या शुक्रवारी ते आघाडीची भूमिका मांडणार आहेत.
शेतकरी संघटनेवर अन्याय ?
दरम्यान या आघाडीतून राजेश नाईक यांनी सर्व शेतकरी संघटनांकडून उमेदवारी मागितली होती. ती नाकारण्यात आल्याने आघाडीला रामराम ठोकून उमेदवारी मागे घेतली. तर नाईक यांच्या मागे कोणतीही शेतकरी संघटना अधिकृतपणे उभे नसल्याने त्यांच्या उमेदवारीचा विचार केला नसल्याचे शिवशाहू आघाडीच्या सूत्रांनी सांगितले.
शेकाप अधांतरी
शेकापने दोन्ही आघाडीकडे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यास प्रतिसाद मिळाला नाही. आज बाबासाहेब देवकर यांनी शिव शाहू आघाडीशी चर्चा केली. त्यांना अपेक्षित गटात उमेदवारी न दिल्याने शेकापला येथेही अधांतरी राहावे लागले.