कोल्हापूर : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर बेपत्ता झालेले पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले. कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा घरात जावून त्यांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. मालवण पोलीस ठाण्यात चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोघाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामध्ये शिल्पकार जयदीप आपटे तसेच कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणाऱ्या चेतन पाटील यांचा समावेश होता.
पाटील यांच्या अटकेसाठी मालवणचे एक पोलीस पथक कोल्हापुरात तळ ठोकून होते. ते कोल्हापूर पोलिसांच्या मदतीने शोध घेत होते. गेल्या चार दिवसांपासून चेतन पाटील हे घरातून फरार होते. गुरुवारपर्यंत त्यांचा शोध पोलिसांना लागला नव्हता. मालवण आणि कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली होती. मात्र चेतन पाटील यांचे दोन्हीही मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्यांचा माग पोलिसांना लागत नव्हता.
कोल्हापूर पोलीस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या दोघांकडून डॉ. चेतन पाटील यांचा मागावर होते. मात्र दोन्ही मोबाईल स्विच ऑफ असल्याने तपासात अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान गुरुवारी मध्यरात्री चेतन पाटील यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पाटील यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.