कोल्हापूर : आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, ऐतिहासिक वेशभूषेतील लवाजमा, वाद्यांचा गजर आणि नयनरम्य आतषबाजी अशा उत्साही वातावरण छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव शिवमय वातावरणात पार पडला.
छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने या रथोत्सवाचे आयोजन केले जाते. खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत भवानी मंडपातून रथोत्सवाला सुरुवात झाली. फुलांच्या पायघड्यांवरून रथ पुढे सरकला. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमार्गे बालगोपाल तालीम मंडळ येथे रथाचे जोरदार स्वागत झाले.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोलताशा पथकाच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘महाराणी ताराराणी की जय जयघोषाने रथोत्सवाचा उत्साह वाढला.मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरीमार्गे रथ पुन्हा भवानी मंडपात पोहोचल्यानंतर रथोत्सवाची सांगता झाली.