कोल्हापूर – शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनास शुक्रवारी उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहा ठराव उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एकमताने संमत केले.
येथील महसैनिक दरबार हॉलच्या प्रांगणात अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार यांनी मोठी उपस्थिती लावली आहे. शिवसेना, सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष करीत अधिवेशनाला सुरुवात झाली. दिवसभरात तीन सत्रे व मार्गदर्शनपर भाषणे झाली. बंदिस्त सभागृहात अधिवेशन होत असताना माध्यमांना प्रवेश देण्यात आला नव्हता. त्याचा वृत्तांत नंतर कथन करण्यात आला.
हेही वाचा – कोल्हापुरात शिवसेनेच पहिले महाअधिवेशन उद्यापासून; जय्यत तयारी
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ६ ठराव पारित करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन, पहिलाच ठराव पारित करण्यात आला. देशाची प्रगती होण्यासाठी मोदी यांनी काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी काश्मीरबाबत ३७० कलम रद्द संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव होता. पाचवा ठराव हा राजकीय ठराव असून लोकसभेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढून राज्यात मिशन ४८ यशस्वी करणे हा होता.
हेही वाचा – एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या रूपात पाहायचे आहे – अर्जुन खोतकर
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात केली. त्या वेळेपासून शिवसेनेच्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना त्याचा विसर पडला आहे. पण एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन काम करत आहेत. शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत ज्यांनी काम केले आहे त्यांच्या नावाने शिवसन्मान पुरस्कार देण्याचा ठराव पारित करण्यात आला. यामध्ये दत्ताजी साळवी या नावाने उत्कृष्ट कामगार पुरस्कार, सुधीर जोशी यांच्या नावाने नाविन्यपूर्ण उभारता उद्योजक पुरस्कार, प्रमोद नवलकर यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, दत्ता नलावडे यांच्या नावाने आदर्श शिवसैनिक, दादा कोंडके यांच्या नावाने कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार, वामनराव महाडिक यांच्या नावाने क्षेत्रातील पुरस्कार, उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार शिवसेना नेते शरद आचार्य यांच्या नावाने दिला जाईल. हे पुरस्कार शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होणार असून त्याचे वितरण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण होईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.