कोल्हापूर : शिवसेनेचे दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशन कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवार, १६ व १७ फेब्रुवारी रोजी आयोजित केले आहे.
या राज्यव्यापी महाअधिवेशनाबद्दल माहिती देताना शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव किरण पावसकर म्हणाले की, २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष आहे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली काय तयारी आहे, याचे आकलन करण्यासाठी हे राज्यव्यापी महाअधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिवेशनामध्ये पहिल्या सत्रात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा होणार आहे. पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा या सत्रामध्ये घेतला जाणार आहे. तसेच या महाअधिवेशनामध्ये पक्षाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे राजकीय ठराव मांडले जाणार आहेत आणि त्यावर विचार विनिमय व चर्चा केली जाणार आहे. ते राजकीय ठराव दुसऱ्या सत्रामध्ये मंजूर केले जातील. तिसऱ्या सत्रामध्ये निवडणुकांच्या तयारीसंदर्भात चर्चा होईल. या सत्रात आगामी लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने आपण काय तयारी केलेली आहे, आणखी काय तयारी करायला हवी, याबद्दल पक्षाचे जेष्ठ नेते सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वरिष्ठ नेते आणि पदाधिऱ्यांमध्ये खुली चर्चा या सत्रात होणार आहे. नंतर या सत्राचा समारोप होईल.
तिसऱ्या सत्राच्या समारोपानंतर संध्याकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते संबोधित करतील.

हेही वाचा – हातकणंगलेच्या खासदारांनी काय केले ? प्रकाश आवाडे यांची टीका

हेही वाचा – शिवाजी विद्यापीठाचे ५ कोटी ४२ लाख तुटीचे अंदाजपत्रक मंजूर; सदस्यांची टीका

या प्रकारचे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याविषयी पुष्कळ वेळा चर्चा झाली, पदाधिकाऱ्यांचीसुद्धा अधिवेशन घेण्याची वारंवार मागणी होती. अशा अधिवेशनाने राज्यातील सर्व पदाधिकारी एकत्र येतील, एकत्र आल्यावर त्यांची चर्चा होईल. असे त्यांचे म्हणणे होते. पदाधिकाऱ्यांमध्ये या अधिवेशनाचा खूप उत्साह होता. त्यानुसार सर्वसंमतीने या महाअधिवेशनाच्या तारखा नक्की करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या करवीर वासिनी अंबाबाई मातेचे दर्शन घेऊन सर्व नेते पदाधिकारी या महाअधिवेशनाला सुरुवात करतील, अशी माहिती पावसकर यांनी दिली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena statewide convention in kolhapur on friday saturday ssb