कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयाची कपात केल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश योग्य आहे. त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी आहे , असे मत गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोकुळने गाय दूध दर दोन रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची सतत आंदोलने सुरू होत आहेत. दोन दिवसापूर्वी मनसेने एका दूध केंद्राची मोडतोड केली होती. त्यात तीन कर्मचारी जखमी झाले होते. वातावरण तापले असतानाही काल गोकुळ दूध संघाच्या बैठकीत दूध दर कपात करण्याचा निर्णय बदलला नाही. आपला निर्णय ठाम असल्याचे संचालकांचे अध्यक्षांसह संचालकांचे म्हणणे आहे .मात्र या बैठकीमध्ये विरोधी संचालिका महाडिक यांनी विरोध केला होता.

हेही वाचा >>> Video : गरबा खेळायला जाण्यासाठी विद्यार्थिनींकडून चक्क शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर, कोल्हापूरमधील घटना

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज महाडिक यांनी आपले भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. त्या म्हणाल्या, आजही गोकुळला गाय दूध दर दोन रुपयांनी वाढवून शक्य आहे. गोकुळ मध्ये दूध पावडरचा साठा असला तरीही जिल्ह्याबाहेरील दूध घ्यायचे नाकारले आणि जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना दर दिला तर शेतकऱ्यांचा रोष कमी होईल. पण धोरणात्मक निर्णय घेण्यात गोकुळ कमी पडत आहे असा आरोप महाडिक यांनी केला.यापुढे सर्वत्र गाय दुधालाच मागणी वाढत राहणार आहे. ही भूमिका गोकुळच्या संचालक मंडळाने लक्षात घेतली पाहिजे . विद्यमान संचालक मंडळाच्या अकार्यक्षमतेमुळे गोकुळचे नुकसान होत आहे.

संचालकांची उधळपट्टी वाढली

संचालक मंडळाचा खर्च ३० लाखावरून ५० लाख गेला आहे. आलिशान गाड्या, हॉटेल, प्रवास यावर भरमसाठ उधळपट्टी केली जात आहे. एका संचालकाच्या नव्याने झालेल्या हॉटेलमध्ये बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची सतत सोय केली जात आहे ,असा आरोपही त्यांनी केला.

विशेष अधिकारी बिनकामाचे

अमुल व अन्य खाजगी दूध संघांचे आव्हान असतानाही गोकुळ अजूनही केवळ दूध विक्री करण्यावर समाधान मानत आहे. अमुल प्रमाणे दुग्धोत्पादन पदार्थ तयार करून विकले तर गोकुळ अधिक सक्षम होऊ शकतो. पण त्यासाठी दोन विशेष अधिकारी आणूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे दूध दर कमी करावे लागत आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या आक्रोशाला गोकुळला सामोरे जावे लागत आहे. मी ही या आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहे, असा निर्धारित त्यांनी व्यक्त केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoumika mahadik back farmers protest against reduction in cow milk price of by gokul zws