कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा, सर्व घटकांना मुख्य प्रवाहित सामील करुन विकासात्मक वाटचालीचा आणि कोल्हापूरच्या सर्वंकष उन्नतीचा विचार दिल्लीपर्यंत पोहोच करण्यासाठी आपण लोकसभेच्या मैदानात उतरत आहोत. जनतेने प्रचंड आग्रह धरल्यानेच हा निर्णय घेतला आहे. आपली उमेदवारी म्हणजे कोल्हापूरच्या जनतेच्या स्वाभिमानाची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी त्यांचाच पुढाकार असेल’, अशी भावना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी गुरुवारी रात्री व्यक्त केली.
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित झाली. ते काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार मित्र पक्षांची पसंती त्यांच्या उमेदवारीला मिळाली आहे.
हेही वाचा >>> नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ
उमेदवारीचे स्वागत
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होती. त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यापासून सर्वपक्षीय संघटना, संस्थांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर कोल्हापुरात आनंदाचे, उत्साही वातवरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. समाजातील विविध संघटना, मान्यवरांनी महाराजांची भेट घेऊन पाठिंबा दिला. या निवडणुकीत महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करतानाच त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. उमेदवारीच्या घोषणेत आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही प्रचाराच्या नियोजनाला लागले. यामुळे आघाडीत नवउत्साह निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराला शाहू महाराज जाणार; उद्धव ठाकरे समवेत झालेल्या चर्चेत निर्णय
नागरिकांचा प्रतिसाद; निवडणूक जिंकू
उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांच्या कर्तबगारीने तेजाळलेली ही नगरी आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या वास्तव्याने या नगरीला धार्मिक अधिष्ठान आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक क्रांतीची, वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीची, बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा यामुळे संबंध भारतभर कोल्हापूरची वेगळी ओळख आहे. राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचा तोच वारसा तितक्याच ताकतीने आपणाला पुढे न्यायचा आहे. यासाठी जनतेने केलेल्या प्रचंड आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. ते म्हणाले, सामाजिक समतेचा, समानतेचा, उद्यमशीलतेचा, कला, क्रीडा क्षेत्रांना प्रोत्साहित करण्याची परंपरा अखंडित राहिली पाहिजे ही आपली भावना आहे. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या पंक्तीत कोल्हापूर उठावदार दिसेल, येथील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळेल, सुशिक्षितांच्या हाताला रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. उद्योग-व्यवसायाला आणखी चालना देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. संपूर्ण कोल्हापूर जिल्हयाच्या सर्वंकष विकासाचे चित्र माझ्या डोळयासमोर आहे. हा जिल्हा विविधतेने नटला आहे. निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. पर्यटनदृष्टया साऱ्यांना आकर्षित करणारा आहे. ऐतिहासक वारसा तर साऱ्यांना भूषणावह आहे. प्रत्येक तालुक्याच्या गरजा, त्यांच्यातील क्षमता, नागरिकांच्या आशा-आकांक्षाना मूर्त रुप देण्यासाठी कृतीशील आराखडयाची प्रभावी अंमलबजावणी केली तर कोल्हापूर विकासाच्या नव्या मार्गावर धावू शकेल असा मला विश्वास आहे. यासाठी साऱ्यांच्या सहकार्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींचा पाठिंबा आणि संबंध जिल्ह्यातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद यामुळे ही निवडणूक आपण जिंकू.’असा विश्वासही शाहू महाराज यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा
कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा घेऊन आपण लोकसभा निवडणूक लढवत आहोत. कोल्हापूरची जनता सूज्ञ आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचा वारसा जपणाऱ्या गादीला मान आणि मत दोन्ही देतानाच विकासाला नवा चेहरा देण्यासाठी पुढाकार घेईल याची खात्री आहे. यातून समतेचे नवे पर्व सुरू करण्याची संधी जनता निश्चितपणे साकार करेल याचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.