राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणास अर्थसंकल्प अधिवेशनात मान्यता, यंत्रमाग कामगारांसाठी महामंडळ स्थापन करणार व यंत्रमागाच्या विजेचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार, असा घोषणांचा तिहेरी बार उडवत सहकार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वस्त्रनगरीतील वस्त्रोद्योजकांची मने जिंकत अच्छे दिनाचे संकेत दिले. जोडीलाच आमदार सुरेश हाळवणकर यांना लाल दिवा देणार असल्याचे सांगत आणखी एक आपटबार उडवत आणखी एका दिवाळीसाठी सज्ज राहण्यास सांगितले.
इचलकरंजीतील भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेणाऱ्या लेखाजोखाचे प्रकाशन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. खासदार संजय पाटील, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शहर विकास आघाडीचे नेते अजित जाधव, अरुण इंगवले, प्रमोद पाटील, हिंदुराव शेळके, जयवंत लायकर आदींची भाषणे झाली. आमदार हाळवणकर यांनी आपल्या कार्यावर विरोधकांनी टीका केली तरी जनतेचे कार्य स्वीकारुन दुसऱ्यांदा संधी दिली आहे. जनतेचे ऋण फेडण्यासाठी पहिल्याच वर्षांत ५७ कोटीची विकासकामे केली असून दिलेला प्रत्येक शब्द, योजना निश्चितपणे अस्तित्वात आणण्यात येईल, असे सांगितले.
वक्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा ऊहापोह करीत पालकमंत्री पाटील यांनी आपल्या भाषणात घोषणांचा सपाटा लावला. ते म्हणाले, राज्याचे वस्त्रोद्योग धोरणाचा अहवाल हाळवणकर यांनी शासनाकडे सादर केला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होणार नाही, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो निश्चितपणे मंजूर करण्यात येईल. त्यातून इचलकरंजीला टेक्स्टाईल हब बनवण्यात येईल. राज्यातील यंत्रमाग कामगारांसाठी दत्तोपंत ठेंगडी यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतील. यंत्रमागाच्या वीज दरातील इंधन अधिभार काढण्याचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल. त्याचबरोबर यंत्रमागाच्या विजेचे दर पाच वर्षे स्थिर ठेवण्यात येतील. इचलकरंजी शहराच्या विकासासाठी हाळवणकर यांनी हाती घेतलेल्या सर्व योजना मंजूर केल्या जातील. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत हाळवणकर यांनी दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून दाखवली असून त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांना महामंडळाचा लाल दिवा मिळवून दिला जाईल.शहर भाजप अध्यक्ष विलास रानडे यांनी स्वागत केले. नगरसेवक संतोष शेळके यांनी आभार मानले.

Story img Loader