कोल्हापूर : चांदी व्यवसायातील भेसळखोरांमुळे व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, मागणीसाठी चांदीनगरी हुपरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. याच मागणीसाठी चांदी कारखानदार असोसिएशनचे संचालक धनंजय धायगुडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बंदला व्यापारी व्यावसायिक व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हातकणंगले तालुक्यातील हुपरी हे गाव चांदीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे, जिथे गेल्या अनेक वर्षांपासून चांदीचे दागिने बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो, त्यामुळे या गावाला ‘चांदीनगरी’ म्हणून ओळखले जाते. हुपरीमध्ये चांदीचे विविध प्रकारची उत्पादने बनवण्यामध्ये, विशेषतः दागिने बनवण्यामध्ये कारागिरांची विशेष कुशलता आहे. हुपरीतील लोक चांदीचे दागिने बनवण्यासाठी कच्ची चांदी व्यापाऱ्यांकडून घेतात आणि मग ते दागिने तयार करतात चांदी व्यवसायाच्या विकासासाठी ‘असोसिएशन हुपरी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे, जी या व्यवसायात मदत करते. 

हुपरी शहर आणि परिसरात चांदी पाटल्यात (विटा) भेसळ करून त्याची विक्री करून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश गेल्या आठवड्यात झाला होता. पोलिस ठाण्यापर्यंत फसवणूक प्रकरण जाऊन देखील राजकिय वरदहस्त तसेच आर्थिक तडजोडीमुळे भेसळ खोर मोकाट होते. अशा भेसळ खोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चांदी कारखानदार असोसिएशनतर्फे आजपासून बेमुदत हुपरी बंद तसेच उपोषण आंदोलन पुकारण्यात आले आहे.

चांदी व्यवसायाशी संबंधित तसेच विविध सामाजिक, राजकिय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा देत भेसळखोर लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उप अधीक्षक समिरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे आदींनी आंदोलनकर्त्याशी चर्चा केली. आमदार राहुल आवाडे यांनी मोबाईल वरून अनदोलांकर्त्यांशी संपर्क साधत याप्रश्नी विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाही दिली. गोकुळ चे संचालक मुरलीधर जाधव, शिवसेना ( ठाकरे) जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनीही येथे भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दर्शविला आहे.

पोलीस उप अधीक्षक समीरसिंह साळवे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्ते तसेच चांदी कारखानदार असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी फोनवर चर्चा घडवून आणली. त्यानुसार योग्य ती कारवाई करण्याची तसेच चांदी असोसिएशन पदाधिकारी यांच्यासमवेत जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयात आज सायंकाळी सहा वाजता बैठक आयोजित केली आहे.