लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारल्याने त्याला विरोध करीत शुक्रवारपासून इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बेमुदत बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे दररोज सुमारे २५ कोटी रकमेच्या सुतावर होणारी सायझिंग प्रक्रिया थांबली असून लवकरच यंत्रमाग उद्योगावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
यंत्रमागावरील कापड निर्मितीत सायझिंग हा महत्वाचा उद्योग आहे. कापड विणण्यापूर्वी धाग्याला बळकटी आणावी लागते. हे काम सायझिंग प्रक्रियेत होते. इचलकरंजी परिसरात असे सुमारे दीडशे उद्योग आहेत. सायझिंग उद्योगा मुळे प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी बायोडायजेस्टर यंत्र बसवावे, अशी सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली होती. त्याची अंमलबजावणी न केल्याने चार सायझिंगचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
आणखी वाचा-माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खून प्रकरणात तिघांचा सहभाग; दोघांना अटक
या विरोधात इचलकरंजी सायझिंग असोसिएशनने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उद्योगामुळे प्रदूषण होत नाही असा मुद्दा मांडला होता, त्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिसाद दिला नाही. या कारवाईच्या निषेधार्थ सायझिंग चालकांनी आजपासून उद्योग बंद ठेवले आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष जयंत मराठे , उपाध्यक्ष प्रमोद म्हेतर, सचिव दिलीप ढोकळे यांनी सांगितले.
आर्थिक फटका
यामुळे सायझिंग उद्योगात होणारी उलाढाल थांबली आहे. अत्याधुनिक पीएलसी सायझिंग ७०, साधे सायझिंग ८० असे सुमारे दीडशे उद्योग आहेत. या सायझिंगवर दररोज सुमारे पावणे नऊ लाख किलो सुतावर प्रक्रिया केली जाते. याची रक्कम सुमारे २६ कोटी ५० लाख रुपये आहे. त्यातून सायझिंग चालकांना दररोज सव्वा दोन कोटी रुपयांची मजुरी मिळत असते. आता हे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
आणखी वाचा-कोल्हापूरच्या सुपुत्राची युनायटेड किंग्डम सरकारच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती
यंत्रमागावर परिणाम
दरम्यान सायझिंग बंद झाल्याने त्याचा यंत्रमाग व्यवसाय परिणाम होणार असे दिसू लागले आहे. याबाबत इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सध्या यंत्रमागावर कापड विणण्यासाठी बिमे आहेत. ती जसजशी संपतील तस तसा यंत्रमाग व्यवसाय परिणाम होणार आहे. सूत, बिमे न मिळाल्याने यंत्रमाग व्यवसायही काही दिवसांनी बंद पडण्याची भीती आहे.