सायझिंग कामगारांच्या प्रश्नाबाबत कृती समितीने घेतलेल्या मतदानामध्ये बहुसंख्य सायझिंगधारकांनी पगारवाढ नाकारण्याच्या बाजूने कौल दर्शविला. तर सायझिंग कामगारांच्या मेळाव्यात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सायझिंगस्तरावर मिळणारी पगारवाढ घेऊन कामावर रुजू होण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सायझिंगधारक व कामगार या दोन्ही घटकांनी पुन्हा टोकाची भूमिका घेतल्याने ४३ दिवसांनंतरही या प्रश्नाचा गुंता कायम राहिल्याने वस्त्रनगरी इचलकरंजीतील चिंता आणखी वाढीस लागली आहे.
सायझिंग कामगारांनी सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून याबाबत कामगार मंत्री प्रकाश मेहता व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत झालेली बठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे या प्रश्नी उभय घटक कोणती भूमिका घेणार याकडे इचलकरंजीकरांचे लक्ष वेधले होते.
सायझिंगधारक कृती समितीची बठक होऊन त्यामध्ये कामगारांना ५०० रुपये पगारवाढ देण्याबाबत मतदान घेण्याचा निर्णय झाला होता. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून ९७ सायझिंगधारकांनी मजुरीवाढ नाकारली तर अवघ्या २० जणांनी त्याला संमती दिली. बहुसंख्य सायझिंगधारकांची ही भूमिका पाहता पगारवाढ दिली जाणार नसल्याने या प्रश्नाचा गुंता कायम राहिला आहे. तसेच सध्याच्या पगारामुळे सायझिंग चालविणे परवडत नसल्याने उद्योगच बंद ठेवावा अशी मानसिकताही सायझिंगधारकांची असल्याचे दिसून आले आहे.
दुसरीकडे सायझिंग कामगारांचा मेळावा थोरात चौक येथे झाला. सुधारित किमान वेतन हे न परवडणारे विष असा सायझिंगधारकांकडून केला जाणारा कांगावा धादांत खोटा आहे. म्हणूनच सायझिंग मालक आणि कामगारांनी समोरासमोर बसून न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून तोडगा काढावा आणि सायझिंग कृती समितीचा फुगा फोडावा, असे आवाहन कामगार नेते ए. बी. पाटील यांनी केले. तर उद्या शुक्रवारी शहरातून कामगार आणि आंदोलनासाठी मदतफेरी काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा