देशद्रोही कारवाई करणा-या सनातन संस्थेवर बंदी घालून तिच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी शहीद कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने आज शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली. तसेच समीर गायकवाडच्या मागचे सूत्रधार, संस्था व राजकीय प्रेरणा यांची सखोल चौकशी करून त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या वेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने सहा जिल्ह्यांतील वकील गायकवाडचे वकीलपत्र घेणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या संघर्ष समितीचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ तणाव जाणवत राहिला.
समता संघर्ष समितीच्या वतीने पानसरे यांच्या खुनाचा तपास होण्यासाठी गेले सात महिने आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर तपास मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचावा ही मागणी घेऊन शुक्रवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अमित सनी यांची भेट घेतली. या वेळी नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, गिरीश फोंडे यांनी विविध मुद्दे उपस्थित करीत सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली.
निवेदनात गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास त्वरित करून समीर गायकवाडच्या मागचे सूत्रधार व राजकीय प्रेरणा यांचा तपास करून शिक्षा करा, पानसरे हत्या तपासातील पोलीस महानिरीक्षक रीतेशकुमार व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची बदली करून सरकारने हस्तक्षेप केला. आता तपासात गती घेतली असताना कोणताही हस्तक्षेप करू नये, दाभोलकर व कलबुर्गी यांच्या खुनात सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग तपासावा, भारतीय संस्कृतीला बदनाम करणा-या फॅसिस्ट संघटनेबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच या खुनाचा तपास राजकीय हस्तक्षेप विरहित करावा, शासकीय यंत्रणा व शिक्षण संस्थांचा वापर करून धार्मिक सहिष्णुता पसरवून युवक विद्यार्थ्यांची डोकी भडकावली जात आहेत ते थांबवावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
गायकवाडचे वकीलपत्र घेणार नाही
कोल्हापूर जिल्हा बार कौन्सिलबरोबर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील कौन्सिल सदस्य एकही वकील समीर गायकवाडचे वकीलपत्र घेणार नाही. गोविंद पानसरे बार कौन्सिलचे सदस्य होते. त्यांचे आम्हाला मार्गदर्शन असत. या लढाईत आमचा पाठिंबा असणार आहे, असे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांवर पानसरेंची टीका
गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर आम्ही सनातन संस्थेबाबत संशय व्यक्त केला होता. समीर गायकवाड याच्या अटकेमुळे तो खरा ठरला आहे. असे सांगून पानसरे यांची कन्या स्मिता पानसरे यांनी यापुढे रस्त्यावरची धारदार लढाई करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असल्याचे सांगितले. सनातन संस्था ज्या विचाराने वागत आहे त्या विचाराच्या पक्षाचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या मौनाबद्दल आश्चर्य वाटत नाही, अशी टीका पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

Story img Loader