कोल्हापूर : खऱ्या एक लाख रुपयाच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळतील, अशा आशयाच्या जाहिराती समाज माध्यमांमध्ये आग्रेशित होऊ लागल्या आहेत. यातून लोकांना गंडा घालण्याची शक्यता वाढीस लागली आहे. सायबर विभागाने अशा चित्रफिती बंद करण्याची कारवाई केली असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. सध्या समाज माध्यमाचा आधार घेऊन लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे वेगवेगळे प्रकार पुढे येत आहेत. बाजारात बनावट नोटांच्या सुळसुळाट झाल्याचे दिसते. यालाच खतपाणी घालणाऱ्या चित्रफिती समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. कोल्हापूर परिसरात इंस्टाग्राम या समाज माध्यमात अशाच बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्या रील पाहायला मिळत आहेत.

खऱ्या एक लाख रुपयांच्या नोटा द्या, त्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळतील. या नोटा एटीएम मध्ये सुद्धा चालतात, अशा प्रकारची जाहिरात यामध्ये केली जात आहे. लाल टी-शर्ट परिधान केलेला तरुण नोटांच्या बंडलवर बसलेला आहे. हातात नोटांचे पुडके घेऊन तो लोकांना अशा प्रकारची प्रलोभन दाखवत आहे. या चित्रफितमध्ये नोटा मोजण्याची मशीन दिसत आहे. त्यातून नोटा मोजून दाखवल्या जात आहेत. यामध्ये काही मराठी नावे सुद्धा दिसत आहेत. यामुळे या माध्यमातून मराठी माणसांची फसवणूक करण्याचे षङ्यंत्र रचले गेले आहे का, असा प्रश्न समाज माध्यमात उपस्थित केला जात आहे.

पोलीस सतर्क

चित्रफितीचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर दिसून येत आहेत. अशा प्रकारच्या चित्रफिती यापूर्वीच बंद केल्या आहेत. लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्यास अथवा भारतीय चलनाचे बनावटी करण्याच्या चित्रफिती आढळल्यास पोलीस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.