सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आक्टोबर महिन्यात तब्बल सहा लाख ३३ हजार ४८० िक्वटल कांद्याची आवक आणि विक्री झाली असून यातून ९२ कोटी ७२ लाख ८२ हजारांची उलाढाल झाली आहे. कांदा बाजारात सोलापूरने लासलगावाला मागे टाकल्याचा दावा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, माजी आमदार दिलीप माने यांनी केला आहे.
एकेकाळी दुष्काळाचा कायम पाठलाग असलेल्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडे साखर उद्योगाने भरारी घेऊन संपूर्ण देशात अव्वल स्थान मिळविले आहे. जिल्ह्यात सध्या तब्बल ३६ साखर कारखाने अस्तित्वात आहेत. मागील वर्षी याच जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांनी केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात सर्वाधिक सुमारे एक कोटी ९२ लाख कोटी मे. टन उसाचे गाळप केले होते. त्यानंतर आता कांदा आवक आणि विक्रीच्या क्षेत्रातही सोलापूरने उंच भरारी घेतली आहे.
दोन महिन्यांपूर्वी कांदा दर वाढला होता. त्यावेळी २१ सप्टेंबर रोजी लासलगाव कृषी बाजारात कांदा दर ६९०० रुपये इतका वाढला होता. त्याचदिवशी सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात कांदा दर लासलगावापेक्षा जास्त म्हणजे ७४०० रुपये एवढा मिळाला होता. त्यानंतर देखील सोलापूर हे कांदा दरात लासलगावाच्या पुढेच राहिले आहे.
गेल्या आक्टोबरमध्ये राज्यातील कांदा व्यापारावर दृष्टिक्षेप टाकला असता त्यात सोलापूरने भरीव अशी आघाडी घेतल्याचे दिसून येते. लासलगावात आक्टोबरमध्ये ३० हजार २५२ िक्वटल कांदा आवक होऊन ८ कोटी ५२ लाख ७५ हजार ६३१ रुपयांची उलाढाल झाली होती. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीही कांदा विक्रीसाठी आघाडीवर असते. वाशीमध्ये आक्टोबरमध्ये आवक झालेला कांदा दोन लाख ७५ हजार ८९० िक्वटल इतका होता. नाशिक येथेही सात हजार िक्वटल कांदा विक्रीसाठी आला होता. परंतु याच कालावधीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात उच्चांकी स्वरूपात तब्बल सहा लाख ३३ हजार ४८० िक्वटल कांद्याची आवक होऊन विक्री झाली. यातून झालेली उलाढाल ९२ कोटी ७२ लाख ८२ हजार एवढी झाल्याचे सभापती दिलीप माने यांनी सांगितले. कांदा लिलाव पारदर्शक असून वजनकाटे इलेक्ट्रॉनिक्स आहेत. बाजारात आलेल्या कांद्याच्या सुरक्षिततेसाठी शंभर सुरक्षारक्षक तनात असतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रोजच्या रोज कांदा विक्रीची रक्कम अदा केली जाते. त्यामुळेच गेल्या चार-पाच वर्षांपासून सोलापूर कृषीउत्पन्न बाजार समितीने कांदा विक्रीत राज्यात व देशात आघाडी घेतल्याचे माने यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur ahead in onion purchase then lasalgaon washi
Show comments