लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फे मलकापूर येथील जवानास वीरमरण आले. सुनील विठ्ठल गुजर ( वय २७) असे या हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे.

सुनील गुजर हे सन २०१९ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. पुणे येथे बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून मणिपूर येथे बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजावत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव रविवारी गावी दाखल होईल.