कोल्हापूर चित्रनगरीची लवकरात लवकर उभारणी करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे बोलताना दिली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रस्तुत अनंत माने जन्मशताब्दी वर्षांनिमित्त येथील शाहू स्मारक भवन येथे तीन दिवसांसाठी आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला; त्या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर, रामभाऊ चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी महामंडळाच्यावतीने वयोवृध्द चित्रपट कलावंतांना दरमहा ५०० रुपये पेन्शन देण्याच्या उपक्रमांतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पेन्शनचे धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर चित्रनगरी उभारण्यात सध्या कसलीही तांत्रिक अथवा निधीची अडचण नसल्याचे स्पष्ट करुन पाटील म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीच्या उभारणीस शासन सकारात्मक आहे. ७ कोटी रुपये खर्चून संरक्षण िभत उभारण्यात आली असून, येत्या १५ दिवसात कोल्हापूर चित्रनगरीसंबंधी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांसमवेत बठक घेऊन चित्रनगरी उभारण्यासाठी शासन निश्चितपणे पाऊल टाकेल.
फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक विलास पाटील  म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीच्या उभारणीबाबत कसलीही तांत्रिक अडचण नसून शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. अनंत माने यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी उंची प्राप्त करुन दिली असून त्यांनी अनेक अजरामर आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे चित्रपट निर्माण केले आहेत. त्या स्मृतिप्रीत्यर्थ नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चित्रपट सृष्टीत भरीव योगदान देणा-या एका कलावंताची निवड करुन त्यांना १ लाख रुपयांचे पारितोषिक अनंत माने प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर, चंद्रकांत जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.  विजय पाटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुर्के यांनी प्रास्ताविक केले. महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांनी आभार मानले.
समारंभास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, अन्य मान्यवर, चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने वयोवृध्द चित्रपट कलावंतांना प्रातिनिधिक स्वरुपात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पेन्शनचे धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader