भोगावती कारखान्याचे अध्यक्ष धर्यशील पाटील-कौलवकर यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत शेतकरी कामगार पक्षाचे संचालक अशोकराव पवार-पाटील व विश्वास वरुटे यांनी संचालक पदाचा राजीनामा कार्यकारी संचालकांकडे दिला आहे. यामुळे भोगावती कारखान्यातून अंतर्गत राजकारणाने वेग घेतला असून आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वाद आणखी धुमसत राहण्याची चिन्हे आहेत.
परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापची साथ घेत सत्ता मिळविली होती. गेल्या निवडणुकीपासून प्रत्येक संचालकांनी रोजंदारीवर कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे. संचालकांनी भरती करताना नातलगांची वर्णी लावल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. अशा गोंधळातच नात्यातील ६० ते ७० जणांना कायम नियुक्तीची पत्रे देऊनही संचालकांचे समाधान झाले नव्हते. उलट आणखी नोकरभरती व्हावी यासाठी काहींचे प्रयत्न सुरू होते. त्यातून नोकरभरतीवरून सत्तारूढ गटात अनेकवेळा जोरदार खडाजंगी झाली आहे. कारखान्याकडे सध्या सुमारे ७७५ कर्मचारी कार्यरत आहेत. आणखी भरती केली तर कारखाना आíथक डबघाईला येईल, या भीतीपोटी नेत्यांचा विरोध आहे.
कोणत्याही क्षणी भोगावतीची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने संचालकांनी भरतीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळेच अशोकराव पवार व विश्वास वरुटे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. एस. पाटील यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष धर्यशील पाटील-कौलवकर यांचा मनमानी कारभार असल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत दोघांनी राजीनामा दिला असल्याने भोगावती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा