राज्यातील अडचणीत आलेल्या सहकारी सूतगिरण्यांना कापूस किफायतशीर भावात मिळावा यासाठी राज्य शासन सीसीआय मार्फत कापूस खरेदी करणार असून यासाठी तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेल्या दरात हाच कापूस सूतगिरण्यांना पुरवला जाणार असून यामुळे गिरण्यांना वर्षभर एकाच भावात कापूस उपलब्ध होणार आहे, ही माहिती वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी आजरा येथे पत्रकाराशी बोलताना दिली.
आजरा सहकारी सूतगिरणीमध्ये आज सूतगिरणी कार्यकारी संचालक मंचाच्या सदस्यांनी वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सूतगिरणी उद्योगातील समस्यांबाबत चर्चा केली. कापूस दरातील अनिश्चितता, वाढते वीज दर, खेळत्या भांडवलाची समस्या आदी मुख्य प्रश्नाची मांडणी मंचचे उपाध्यक्ष चंद्रशेखर फडणीस, ए.बी. चालुक्य, सचिव हेमंत पांडे, दिलीप माळी, युवराज घाटगे, दीपक पाटील, संजयसिंग गायकवाड आदींनी केली. आमदार सुरेश हळवनकर, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष िहदुराव शेळके, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सूतगिरणी अध्यक्ष अशोक चराटी व राज्यातील सूतगिरणी कार्यकारी संचालक उपस्थित होते.
कार्यकारी संचालक मंचाच्या सदस्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर मंत्री पाटील यांनी त्यांना दिलासा देणारे निर्णय घोषित केले. याबाबत पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले, सूतगिरण्यांना कापूस किफायतशीर भावात मिळावा यासाठी राज्य शासन दरवर्षी १५ लाख गाठी कापूस खरेदी करणार आहे. त्यासाठी लागणारी आíथक तजवीज शासन करणार आहे. सूतगिरण्यांना वीजदरात प्रती युनिट ३ रुपये सवलत देणार आहे. याशिवाय खेळत्या भांडवलासाठी प्रती चाती ३ हजार रुपये अर्थसाहाय्य करणार आहे.