लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : देश, राज्यात दुधाच्या मागणीपेक्षा उत्पादन खूपच कमी आहे. युरियासह विविध रसायनांची भेसळ करून दूध विक्री केली जात आहे. या गंभीर प्रकारावर शासनाचे बारीक लक्ष आहे. भेसळ करून पैसे मिळवण्यापेक्षा प्रामाणिकपणे पैसे मिळवा. अन्यथा स्वत:चे नुकसान करून घ्याल. अशांची गय केली जाणार नाही, असा इशारा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी इथे पक्ष कार्यालयात बोलताना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पाटील म्हणाले, राज्यात ५०० हून अधिक सेवा सोसायट्या विविध व्यवसाय करून स्वयंपूर्ण झाल्या आहेत. हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे बहुतांश सोसायट्या राजकारणाचे अड्डे झाल्या आहेत. कोल्हापुरात शिक्षण, कुस्तीसाठी आलो होतो. येथील सहकाराचा आदर्श घेऊन माझ्या भागात संस्था उभ्या केल्या. विक्रमसिंह घाटगे, सा. रे. पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आलो आहे, अशी आठवण त्यांनी सांगितली.

मुश्रीफ जिंकतील असे वाटले नाही

जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य पाहता या वेळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ हे निवडून येतील असे मलाही वाटले नव्हते. सर्व समाजाला घेऊन ते विकासकामे करीत असल्याने केवळ निवडून आले नाही तर मंत्रीही झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात राष्ट्रवादीचे स्वमालकीचे कार्यालय बांधले जाईल, असेही पाटील म्हणाले. जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, आदिल फरास यांची भाषणे झाली.