कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध दर्शवत प्रस्तावित २० गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या सर्व गावातील व्यवहार आज ठप्प झाले होते.कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी याकरिता कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने पुन्हा कंबर कसली आहे. काल सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित केले होते. तर या भूमिकेला विरोध करत ग्रामीण भागातून पुन्हा एकदा विरोधाचे नारे ऐकू येऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी काल धरणे आंदोलन करून आज सर्व गावात बंद पाळण्याचा निर्णय घेतला होता.
यानुसार आज २० गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वच गावातील व्यवहार बंदसकाळपासूनच बंद होते. हद्दवाढी विरोधातील फलक गावागावातील चौकाचौकांमध्ये लावण्यात आले होते. तेथे जमत ग्रामस्थांनी हद्दवाढीच्या विरोधात घोषणाबाजी केली.करवीर, कोल्हापूर दक्षिण व हातकणंगले येथील आमदारांच्या मार्गदर्शनाखाली हद्द वाढीला विरोध केला जाईल. कोल्हापूर प्राधिकरण मजबूत करण्यावर भर राहील. कोल्हापूर शहराला स्वतःचे नागरी प्रश्न सोडवता येत नाहीत; ते ग्रामीण भागाला काय न्याय देणार, अशी विचारणा यावेळी करण्यात आली.
गांधीनगर, पाचगाव, आंबेवाडी, कळंबा, वळीवडे, वाडीपीर, मुडशिंगी, बालिंगे, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, नागाव, नागदेववाडी, वळीवडे, वडणगे, उचगाव, उजळाईवाडी, शिरोली, शिंगणापूर, शिये, सरनोबतवाडी या गावात बंद पुकारण्यात आला.
ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी, ‘२०१७ मध्ये प्राधिकरणची स्थापना झाली. प्राधिकरणच्या माध्यमातून गावांचा विकास करण्याची घोषणा सरकारने केली होती. संतुलित विकास करुन टप्प्याटप्प्याने ही गावे समाविष्ठ करावीत. ग्रामीण जीवन उद्धवस्त होईल असा कोणताही निर्णय घाई गडबडीने घेऊ नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील जनतेचे म्हणणे ऐकावे.’अशा भावना विविध गावच्या सरपंच, सदस्यांनी व्यक्त केल्या.
हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष,उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर, पाचगावचे नारायण गाडगीळ, मोरेवाडीचे सरपंच अमर मोरे , संदीप पाटोळे, बाळासाहेब वरुटे, किरण अडसूळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन चौगले, माजी सरपंच सचिन चौगुले, जोतिराम घोडके यांची भाषणे झाली.
गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, वडणगेच्या सरपंच संगिता पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, नारायण पोवार, , एम. जी. पाटील, रवि पाटील, इंद्रजीत पाटील यांच्यासह सर्व गावातील सरपंच, ग्रामस्थ सहभागी झाले होते. हद्दवाडी संदर्भात सोमवारी मुंबईत बैठक झाली तरी आम्हीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन बाजू मांडणार आहोत, असेही यावेळी सांगण्यात आले.