टाळेबंदीमुळे दारू दुकानांना टाळे ठोकले गेल्याने कोंडी झालेल्या ग्राहकांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील दारू दुकानांसमोर सोमवारी रांगा लावल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण झाले नसल्याने त्यांना तिष्ठत उभे राहावे लागले. सायंकाळी परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांच्या लांबचलांब रांगा लागल्या. नंबर मिळवण्या वरून शहरात अनेक ठिकाणी ग्राहकांत हाणामारी, भांडणे देखील झाली.

टाळेबंदीच्या कालावधीत दारू दुकान बंद राहिल्याने या ग्राहकांमध्ये चुळबुळ सुरु होती. मद्य मिळवण्यासाठी तिप्पट—चौपट किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. तरीही ते मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आज दुकाने उघडण्यास परवानगी दिल्यानंतर ग्राहकांना हायसे वाटले. याच उत्साहाच्या भरात सोमवारी सकाळपासून दारू मिळवण्यासाठी त्यांनी दुकानांसमोर रांगा लावल्या. मात्र जिल्हा प्रशासनाने या बाबतचा निर्णय घेतलेला नसल्याने दुकाने उघडली नव्हती. भर उन्हात ग्राहक दुकान उघडण्याची वाट पाहत होते. दुपारनंतर जिल्हा प्रशासनाने काही अटींवर दुकान सुरू करण्यास परवानगी दिली. दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दुकानांसमोर लागल्या होत्या. त्यात नंबर मिळवण्यातून ग्राहकांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवार पेठ भागात सुशील वाईन्स समोर घडला.

मद्यविक्री मर्यादित वेळेतच

जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने काही अटींवर सुरू राहतील, असे निर्देश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. कंटेनमेंट झोन वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत,५ पेक्षा अधिक ग्राहकन ठेवता, ग्राहकांमध्ये ६ फूट अंतर ठेवून, परिसर दोन तासांनी र्निजतुकीकरण करावा, अशा अटी आहेत.

Story img Loader