कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘ पीएचडी करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत ‘ या वादग्रस्त विधानावर विद्यार्थ्यांनी काय दिवे लावायचे आहेत ते २०२४ निवडणुकीत लावतील,अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकाद्वारे नोंदवली आहे.
२०२३ च्या बॅचला सरसकट फेलोशिप आणि नोंदणी दिनांक पासून फेलोशिप मिळावी, तसेच जाहिरातीत विद्यार्थी संख्या,सीईटी परीक्षा उल्लेख नसतानाही जाहिरातीनंतर सात महिन्यांनी फक्त दोनशे विद्यार्थी सीईटी परीक्षेद्वारे घेण्याचे जाहीर केले. या अन्याय कारक निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील सारथी उपकेंद्रासमोर गेले ४५ दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा… शाळांची वेळ बदलण्याची राज्यपालांची सूचना अव्यवहार्य, शिक्षण संस्थाचालकांचे मत
हिवाळी अधिवेशनातही आमदार सतेज पाटील व अन्य नेते यांनी सारथी संशोधक विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. परंतु यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ पीएचडी करून काय दिवे लावणार आहे ‘अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
महाराष्ट्रातला सुद्धा दोन दोन उपमुख्यमंत्र्यांची गरजच काय?या लोकांना भौतिक सुख सोयींसाठी कोटींमध्ये पैसा उपलब्ध होतो. परंतु गरीब विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही. देशातील संशोधन बंद करण्याचा यांचा डाव आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा वापर सरकारलाच आतापर्यंत करून घेता आलेला नाही. इतर देशांमध्ये संशोधनाला महत्त्व आहे,म्हणून ते देश महासत्ता बनले. परंतु आपल्या देशामध्ये संशोधनालाच आळा घातल्यामुळे आपला देश महासत्ता कसा बनेल?
या महाशयांना विद्येचे महत्त्व माहित नसल्याने त्यांची नीती भ्रष्ट झाली आहे. तर त्यांना विद्येचे महत्त्व आम्ही दाखवून देऊ . जेणेकरून त्यांची मती ठिकाणावर येईल. आम्ही काय दिवे लावणार आहोत ते २०२४ च्या निवडणुकीत लावूच. अशा संतप्त प्रतिक्रियामधून आंदोलक विद्यार्थ्यांनी अजित पवार यांचा वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर निवडून येण्यासाठी संशोधनाचाच वापर झालाय , ज्या खुर्चीवर सभागृहात राहून ते बोलतायेत, ते पद सभागृह हे सुद्धा संशोधनाचेच फलित आहे. देशाच्या विकासासाठी संशोधनाचे महत्त्व नसेल तर सर्व नेत्यांनी त्यांची संशोधन केंद्र बंद करावीत. ज्यात लाखो रुपये फी संशोधनासाठी घेतली जाते. उपमुख्यमंत्र्यांच्या २०२४ च्या निवडणुकीत आम्ही नक्कीच आमचे दिवे लावू. पण या दिव्यांमुळे तुमच्यापुढे अंधारच असेल. यांना नुसत्या इमारती बाधून भ्रष्टाचार करायचं आहे. संशोधक विद्यार्थ्यांचे बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले नाहीत तर विद्यार्थी तीव्र आंदोलने करून सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा संभाजी खोत, सौरभ पवार, अभय गायकवाड, सुहास रोमणे, सनदकुमार खराडे, स्वप्निल पोवार सह विद्यार्थ्यांनी दिला.