लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील समाधीस्थळाच्या जीर्णोद्धार कामाच्या आराखड्याचा प्रस्ताव या महिनाभरात राज्य शासनाला सादर करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिल्या.

महाराणी ताराराणी यांच्या संगम माहुली येथील समाधिस्थळाच्या जीर्णोद्धार कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, महाराणी ताराराणी समाधी जीर्णोद्धार समितीचे निमंत्रक विजय देवणे, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, शाहीर राजू राऊत, संजय पवार, उदय नारकर तसेच शिव, शाहूप्रेमी व इतिहासप्रेमी उपस्थित होते.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पुरातत्त्व व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच या नवीन आराखड्याचे वास्तुविशारद आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या या नव्याने करण्यात आलेल्या आराखड्याचे काम मोठ्या स्वरूपाचे असल्यामुळे हे काम दोन टप्प्यांत व्हावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून गड-किल्ले संरक्षणासाठी असलेल्या तीन टक्के निधीतून पहिल्या टप्प्यात समाधिस्थळाचे संरक्षण व्हावे. त्यानंतर समाधिस्थळाचा जीर्णोद्धार व नूतनीकरणाचे उर्वरित काम हाती घ्यावे. हे काम गतीने मार्गी लावण्यासाठी सुमारे २६ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या आराखड्याच्या कामाचा नवीन प्रस्ताव लवकरात लवकर राज्य शासनाला सादर करून याबाबत पाठपुरावा करा. आराखडा अंतिम होण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील समाधी समितीच्या सदस्यांसोबत बैठक घ्यावी.’

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या समाधीचे जतन व संवर्धन होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येत आहे. जुन्या प्रस्तावात बदल करून सुमारे २६ कोटींचा आराखडा सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने सादर करण्यात येणार आहे. या समाधीचे संरक्षण व नूतनीकरण आराखड्याबाबतच्या कामाचा प्रस्ताव या महिनाभरात शासनाला सादर होण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून नवीन आराखडा तयार करण्यापूर्वीच्या टप्प्यांची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या समाधिस्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी समाधी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याबाबतची माहिती विजय देवणे यांनी बैठकीत दिली.