कोल्हापूर : विधानसभा निवडणुका आणि ऊसतोडणी मजुरांचे मतदान या दोन मुद्द्यांवर लांबलेल्या यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा साखर उद्योगाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. महिनाभर उशिराने सुरू झालेल्या या हंगामामुळे गतवर्षीच्या तुलनेने गाळपात ९२ लाख टनांनी तर साखर उत्पादनात ९२ लाख क्विंटलने घट आल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर कारखान्यांना याचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी दसऱ्याच्या सुमारास ऊस हंगाम सुरू होत असतो. यंदा विधानसभा निवडणूक असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरू करू नयेत असा आदेश लागू केला होता. यामागे मराठवाडा, खान्देश भागातील ऊसतोड मजूर मतदारसंघातच अडकून राहावेत अशी पडद्यामागची रणनीती होती. तरीही २५ टक्के मजूर मतदानापूर्वीच ऊसतोडीच्या ठिकाणी निघून गेले होते.
हेही वाचा : काळम्मावाडी धरण गळती कायम; धोका नाही – शाहू महाराज
साखरेचा गोडवा कमी
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर यंदाचा ऊस गळीत हंगाम दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर उशिरा सुरू झाला. त्याचे काही परिणाम झाल्याचे आकडेवारी दर्शवत आहे.
३० डिसेंबरपर्यंतचा ऊस गाळप अहवाल (पान ६ वर) (पान १ वरून) पाहता ऊस गाळप व साखर उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. गतवर्षी राज्यात सहकारी व खासगी असे २०४ कारखाने सुरू होते. यंदा ही संख्या १९० इतकी कमी झाली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४३० लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ते ३३८ लाख टन इतके कमी झाले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत ३८३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते २९१ लाख क्विंटल झाले आहे. दरम्यान गाळपास उशीर झाल्याने उसाचा कालावधी वाढून त्यातून मिळणाऱ्या साखरेचे प्रमाण घटले. याचाच परिणाम स्वरूप यंदाच्या साखर उताऱ्यातही ०.३ टक्क्यांनी घट आली आहे.
हेही वाचा : नवीन वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी वाचनविषयक आणखी एक उपक्रम
उत्पादनात घट का?
निवडणुकीमुळे यंदा गाळप हंगामास महिनाभर उशीर झाला. या कालवधीत तयार ऊस परराज्यात किंवा स्थानिक पातळीवर गुऱ्हाळांकडे वळला. शेतात राहिलेल्या उसाचे देखील वय झाल्याने त्यापासून मिळणाऱ्या साखरेच्या प्रमाणातही घट आली आहे.
यंदा हंगाम उशिरा सुरू झाल्याने ऊस गाळप व साखर उत्पादन या दोन्हीत मोठा फरक दिसत आहे. शिवाय उसाला तुरे फुटल्याचे चित्र साखर पट्ट्यात सार्वत्रिक असल्याने उसाचे वजन घटले असून साखर उताराही कमी झाल्याचा दुहेरी फटका बसला आहे. परिणामी साखर उद्याोगाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत आहे.
- विजय औताडे, साखर अभ्यासक