दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला असून, या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत गाळपात ७३ लाख टनांची घट दिसत आहे. साखर उत्पादनही ९६ लाख क्विंटलने घटले आहे. त्यामुळे या हंगामात साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, कारखानदार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
देशाच्या दक्षिण भागाला दुष्काळाचे चटके बसत आहेत. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांत ऊसाचे गाळप कमी होणार आहे. देशात सरासरी २० टक्के ऊस गाळप कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमी झालेले पाऊसमान, अवकाळी पावसाचा अभाव, जलाशयातील पाणी पातळीत होऊ लागलेली घट ही यामागची मुख्य कारणे दिसत आहेत.
राज्यात यंदा १ नोव्हेंबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू झाला. यंदा राज्यात एकूण १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून, ८८.५८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, १३ डिसेंबपर्यंतचा राज्य साखर संघाचा अहवाल पाहता ऊसाचे गाळप आणि साखर उत्पादनामध्ये अंदाजापेक्षाही मोठी घट जाणवत आहे.
हेही वाचा >>> कचऱ्यात हरवलेल्या सोन्याच्या हाराची अशीही शोधकथा; इचलकरंजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची तत्परता
राज्यात गेल्या हंगामात १३ नोव्हेंबपर्यंत ३४८ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. ते यंदा २१९ लाख टनांवर आले आहे. म्हणजेच गाळपातच ७३ लाख टनांची घट दिसत आहे. हीच बाब साखर उत्पादनातही दिसत आहे. गेल्या हंगामात पहिल्या दीड महिन्यात ३१५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ते २३० लाख क्विंटलवर घसरले आहे. साखरेचा गोडवा सुमारे ९५ लाख क्विंटलने कमी झाला आहे. साखर उताराही कमी झाल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. गेल्या हंगामात या कालावधीत सरासरी साखर उतारा ९.५ टक्के होता. यावर्षी तो ८.४३ टक्के म्हणजे ०. ७१ टक्क्यांनी घटला आहे.
कोल्हापूरचा उतारा सर्वाधिक
कोल्हापूर विभागाला ऊस दर आंदोलनाचा फटका बसल्याचे दिसत आहे. आंदोलनामुळे येथील हंगाम सुमारे महिनाभर उशिरा सुरू झाला. या भागात ३६ कारखाने सुरू असून, ५३. ७३ टन ऊसाचे गाळप झाले आहे. ५०.३४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूरचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक ९.४२ टक्के आहे. पुणे विभागाचा ८.५५ टक्के, तर सोलापूरचा ७. ७ टक्के इतका आहे. अन्य केंद्रांचा साखर उतारा यापेक्षा खूपच कमी आहे. अहमदनगर केंद्रात २५ कारखान्यांत ३५ .३८ लाख ऊसाचे गाळप होऊन २९.२९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. औरंगाबाद विभागात २२ कारखाने सुरू असून, २५ .२८ लाख टन गाळप झाले आहे. येथे १८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. नांदेड विभागातील २८ कारखान्यांचे हंगाम सुरू असून, ३१. ३५ लाख टन ऊसाचे गाळप होऊन २६. ४५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
विदर्भ कडवट स्थिती
विदर्भात सर्व खासगी कारखाने सुरू आहेत. अमरावतीमध्ये केवळ दोन कारखाने सुरू आहेत. तिथे अडीच लाख टन ऊसाचे गाळप होऊन २.१२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. नागपूर विभागात ३ कारखाने सुरू आहेत. तेथे ३४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
गाळपात पुण्याची आघाडी
’यंदा पुणे विभागाने ६५.४४ लाख टन ऊसाचे गाळप करून राज्यात आघाडी घेतली आहे. २९ साखर कारखान्यांनी ५६ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
’पाठोपाठ सर्वाधिक ४५ कारखाने सुरू असलेल्या सोलापूरचा क्रमांक आहे. या भागात ६१.२२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन ४७.३० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.