कोल्हापूर : ऊस हे नगदी पीक. याचमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा आला आहे. पण अलीकडे ऊस शेती परवडत नाही असा सूर आहे. तर काही शेतकरी वेगळ्या वाटेने जात उसाचे भरघोस उत्पन्न घेण्याकडे लक्ष पुरवतात. ऊस पिकाची योग्य निगा, नियोजन केले, वेळच्या वेळी मशागत केली तर अगदी मुरमाड शेत जमिनीत उसाचे विक्रमी उत्पादन घेता येते हे कोल्हापुरातील प्रयोगशील शेतकऱ्याने कृतीने दाखवून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलत्या हवामानात शेतीचे अधिकाधिक नुकसान होत असल्याचे चित्र असताना कोल्हापुरच्या शंकर पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने आधुकिक पद्धतीने उसाची शेती करून प्रतीगुंठा तीन टन इतके भरघोस, चकित करायला लावणारे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या शेतातील लांबलचक ऊस पाहण्यासाठी प्रयोगशील, कष्टकरी शेतकरी यांच्यासह बघ्यांची गर्दी होत आहे.

हेही वाचा – साखर, इथेनॉलचे दर वाढवावेत – धनंजय महाडिक

उसाचे एकरी उत्पादन कमी होत चालले आहे. ती साखर उद्योगाची मोठी चिंता आहे. ऊसाचे टनेज वाढवण्यासाठी, कार्यक्षेत्रातील विविध गटातील उसाच्या वाणानुसार आणि लागवडीनुसार उसाचे प्रति हेक्टरी उत्पादन माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे कमी क्षेत्रात अधिकाधिक ऊस उत्पादन यावे याकडे त्यासाठी अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. त्याला काही प्रमाणात यशही येऊ लागले आहे. शंकर पाटील यांच्या तीन एकरातील ऊस शेतीमध्ये भरघोस आलेले ऊस पीक हे या प्रयोगाचे यश म्हणावे लागेल.

हातकणंगले तालुक्यातील लाटवडे या गावी शंकर पाटील यांची शेती आहे. गावगाड्यात रमलेल्या पाटील यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. याचवेळी पाटील यांनी कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणूनही नाव कमावले आहे. त्यांना शेतीची जात्याच आवड आहे. त्यामुळेच आजवर त्यांनी द्राक्ष, केळी , पपई अशी प्रयोगशील शेती केली आहे. पारंपरिक पद्धतीने करीत असलेल्या शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने ऊस शेती करून विक्रमी उत्पादन घेण्याचा निर्धार करून त्यांनी उस लागवड करण्याकडे लक्ष पुरवले. त्यांनी ज्या पद्धतीने ऊस शेती केली ते इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरणारे आहे.

ऊस हे पाणी-केंद्रित पीक आहे. ज्याला त्याच्या वाढीच्या अवस्थेत सतत पाण्याचा पुरवठा आवश्यक असतो. सिंचनामुळे जमिनीत पुरेशी आर्द्रता सुनिश्चित होते. पिकांच्या निरोगी विकासास आणि उच्च उत्पादनास चालना मिळते. त्यामुळे पाटील यांनी सुरुवाती पासूनच पाणी व्यवस्थापनाकडे बारकाईने लक्ष दिले.

पाटील यांच्या या प्रयोगाला सुरुवात झाली ती गेल्या वर्षी जुलै महिन्यात. प्रारंभी ८६०३२ या जातीच्या उसाची निवड केली. एकरी ४२ हजार उसाच्या रोपांची संख्या राहणे महत्त्वाचे आहे या उद्देशाने ऊसाची संख्या मोजून घेतली व योग्य पद्धतीने मशागत तसेच खतांच्या मात्रा वेळच्यावेळी देण्यावर भर दिला. बीज प्रक्रिया करून दोन डोळ्यांच्या कांडीची लावण त्यांनी केली. त्याआधी त्यांनी लागण पूर्व मशागत केली. उभी आडवी नांगरट रोटा मारून करताना साडेचार फुटाची सरी सोडली होती. मुरमाड शेत जमिन असतानाही उसाचे पीक उत्तमरित्या यावे यासाठी बारकाईने लक्ष पुरवले. डोळा चांगला यावा, उगवण उत्तम व्हावी यासाठी रासायनिक खतांचा बेसल डोस सुरुवातीला दिला. त्यानंतर आठ दिवसांनी आळवणी केली. २५ दिवसाच्या अंतराने रासायनिक खताचा डोस देण्यात आला. त्यामुळे फुटवे चांगल्या प्रमाणात आले. ऊस जोमदार पद्धतीने वाढू लागला.

पंधरवड्यानंतर जीवामृत स्लरी दोन वेळा देण्यात आली. दोन महिन्यानंतर हलकी बाळ भरणी करण्यात आली. पुन्हा रासायनिक खताचा डोस देण्यात आला. त्यानंतर पुढे पंधरा दिवसांनी ठिबक सिंचन द्वारे जीवामृत स्लरी देण्यात आली. त्यानंतर आणखी पंधरा दिवसांनी संजीवक फवारणी करण्यात आली. तीन महिने सरले. त्यानंतर फुल भरणी करण्यात आली. रासायनिक खतांचा डोस देण्यात आला. पुन्हा पंधरवड्यानंतर जीवामृत स्लरी देण्यात आली

कृषी विद्यापीठातून जिवाणू आणले. ते आठ दिवस कुजवत ठेवले. आणि त्याचा वापर केल्याने ऊस जोमदार वाढला. त्यानंतर एक महिन्यानंतर ड्रोन द्वारे संजीवक फवारणी केली. तर पुढच्या पंधरा दिवसात ड्रोन द्वारे बुरशीनाशक व कीटकनाशक याची फवारणी केली. मे अखेरीस पावसाळी डोस बोंडावर देण्यात आला. एकूणच पीक वाढीसाठी पाणी व्यवस्थापन ही उत्तम पद्धतीने करण्यात आले. बहुतेक पाणी ठिबक द्वारे देण्यात आले.

ठिबक सिंचन एक अत्यंत कार्यक्षम पद्धत आहे. जी उत्सर्जक, नळ्या आणि पाईप्सद्वारे थेट वनस्पतीच्या मुळांमध्ये पाणी पोहोचवते. ही पद्धत पाण्याची हानी कमी करते आणि समान पाणी वितरणास उपयुक्त ठरते. परिणामी पीक उत्पादन आणि पाणी वापर कार्यक्षमता सुधारते. उसासाठी ठिबक सिंचन फायदेशीर आहे. ठिबक सिंचन प्रणाली बाष्पीभवन आणि प्रवाहाचे नुकसान कमी करते. पाण्याचा पिकाला आवश्यक ओलावा मिळेल याची व्यवस्था होत राहते.पारंपरिक सिंचन पद्धतींच्या तुलनेत ठिबक सिंचन ६० टक्के पाण्याची बचत करू शकते. तथापि उन्हाचा पारा वाढू लागल्यावर महिन्यातून एकदा पाटाने पाणी दिले. जानेवारी , फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या चार महिन्याच्या अखेरीस पाटाने पाणी दिल्याने उन्हाचा त्रास पीक वाढीसाठी झाला नाही. अशा पद्धतीने तीन एकरातील आडसाली ऊस वाढीसाठी अत्यंत काटेकोर नियोजन केल्याने आता तब्बल ५० पेरी असणारा लांबलचक वजनदार ऊस १६ महिन्यात तयार झाला. हा ऊस संपूर्ण तीन एकराच्या शिवारात पाहायला मिळत आहे.

पाटील यांना प्रति गुंठ्याला तीन टन ऊस उत्पादन घेण्यात यश आले आहे. जाड पेरी असलेला हा ऊस लांबलचक आणि वजनदार असल्याने त्याची एकच सलग मोळी बांधता येत नाही. त्यासाठी ऊस तीन ते चार ठिकाणी तोडूनच त्याची मोळी बांधावी लागत आहे. सलग तीन एकरातील हा ऊस सुमारे ३६० टन उत्पादन देईल असा दावा पाटील यांनी केला आहे. हा ऊस कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यात पाठवला जात आहे.

हेही वाचा – साखर, इथेनॉलचे दर वाढवावेत – धनंजय महाडिक

इतक्या भरघोस प्रमाणात ऊस वाढण्यासाठी पाटील यांना ऊस शेतीतज्ज्ञ सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कृषी विभागाची पदवी २००८ साली प्राप्त केलेले सचिन पाटील यांनी ऊस शेतीचा विकास होण्याकडे लक्ष पुरवले आहे. त्यांचे हातकणंगले तालुक्यातील भादोले या गावी कृषी सेवा क्षेत्र आहे. दत्त ऍग्रो सर्विस सेंटरच्या माध्यमातून ते ऊस शेती वाढीसाठी सल्लागार म्हणून काम पाहतात.

एकरी ४२ हजार ऊस राहावेत यासाठी अतिरिक्त ऊस काढून उसाची संख्या मोजून घेतली. योग्य पद्धतीने मशागत, खतांची मात्रा वेळच्या वेळी देणे, पाण्याचे योग्य नियोजन याचा सुरेख मेळ सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घातला वेळेच्या वेळी योग्य खते संजय व स्लरी पाण्याचा योग्य वापर केल्याने ऊस पिक चांगले आहे हे एक एकरातील ऊस कामगारा करवी मोजून घेतले चाळीस हजार ऊस आहे एक ऊस ४८ ते ५० पेराचा आहे. एका उसाचे वजन तीन किलो धरले तरी एकरी १२० टन ऊस निश्चितपणे मिळणार आहे, असे शंकर पाटील यांनी सांगतात.

उसाची शेती परवडत नाही अशी तक्रार होत असताना पाटील यांनी विक्रमी उत्पादन घेऊन हा समज फोल ठरवला आहे. शेतीचे योग्य त्या पद्धतीने व्यवस्थापन केले की भरघोस उत्पादन मिळते अन् आर्थिक फायद्याचा गोडवा ही चाखता येतो हेच शंकर पाटील यांच्या प्रयोगाचे सार म्हणावे लागेल.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane cultivation kolhapur changing climate farmers cultivating sugarcane ssb