लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ऊस दरावर तोडगा निघाल्याने याबाबतचे आंदोलन काल मागे घेण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी उसाच्या मळ्यामध्ये पुन्हा संचार दाटला. साखर कारखान्यांनी ऊस गाळपाची जय्यत तयारी सुरू केली आहे. ऊस आंदोलनावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वादाला तोंड फुटले आहे. तर कालच्या आंदोलन प्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये मिळावे आणि यावर्षीच्या हंगामासाठी तीन हजार पाचशे रुपयांची पहिली उचल मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू केले होते. याच मागणीसाठी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील पंचगंगा पुलावर महामार्ग रोखून धरला होता. तथापि सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन ऊस दरावर तोडगा काढण्यात आला.
आणखी वाचा-शासनाने दूध दरात वाढ न केल्यास आंदोलनाचा भडका, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
शेट्टींवर गुन्हा दाखल
दरम्यान राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे आंदोलन केल्याबद्दल शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये वसाहत पोलीस ठाण्यामध्ये आज राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मळ्यात उत्साह फुलला
गेले महिनाभर उसाला तोड नसल्याने एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांमध्य साखर कारखान्यांनी ऊस गाळपास न्यावा यासाठी आंदोलन सुरू होते. काल आंदोलनाची सांगता झाल्यानंतर आज कृष्णा, पंचगंगा काठी उसाच्या मळ्यात उत्साह संचारलेला दिसून आला. शेतकरी मोठ्या उत्साहाने उसाची तोड देत होते. दुसरीकडे साखर कारखान्यांची गाळपाची यंत्रनाही अतिशय सक्रिय झाली आहे. आज रात्री ऊस आल्यानंतर उद्या सकाळपासून ऊसतोड सुरू केली जाणार आहे.
आणखी वाचा-शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश, ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य, टनामागे मिळणार ‘इतके’ रूपये
शेट्टी – खोत वाद रंगला
राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतल्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांशी संगनमत करून आंदोलन मागे घेतले आहे .प्रति टन ५०,१०० रुपये वाढ घेऊन शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली ,असा आरोप केला. त्यावर राजू शेट्टी यांनी लुंगे सुंग्याला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. कोणाला खुमखुम असेल तर त्याने आंदोलन करून अधिक दर मिळवून द्यावा, असे प्रत्युत्तर खोत यांना दिले.