करमाळा पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचे निश्चित कारण लगेचच समजू शकले नाही. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप मृत पोलीस शिपायाच्या नातेवाइकांनी केला आहे.
गणेश तानाजी कुलकर्णी (३६) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याने करमाळा येथे आपल्या घरात स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी व सहा वर्षांची मुलगी आहे. घटना घडली त्या वेळी त्याची पत्नी परगावी गेली होती. मृत गणेश कुलकर्णी याच्या विरोधात एका प्रकरणात चौकशी सुरू होती. हे प्रकरण मिटविताना झालेला त्रास असह्य़ ठरल्यामुळे विशेषत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या छळामुळे त्याने आत्महत्या करून स्वत:चे जीवन संपल्याचा आरोप मृत कुलकर्णी याच्या नातेवाइकांनी केला आहे. रविवारी सकाळी करमाळा शासकीय रुग्णालयात मृत कुलकर्णी याच्या मृतदेहाची न्यायवैद्यक तपासणी झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला होता. परंतु चौकशीचे आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला गेला.