विरार येथील प्रेमी युगुलाने सोमवारी सकाळी हातकणंगले येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये  युवतीचा मृत्यू झाला असून युवकाची प्रकृती गंभीर आहे. सोनी मनीष विनायक असे मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे, तर अरुण प्रल्हाद नाईक असे तरुणाचे नाव आहे.
हातकणंगले या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटय़ाजवळ एक लहान मंदिर आहे. मंदिराजवळ काही टपऱ्या आहेत. या टपऱ्यांमागे एक जोडपे तळमळत पडल्याचे सकाळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना दिसले. त्यांनी ही माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. पोलिसांनी पाहणी केली असता घटनास्थळी विषारी औषधाची रिकामी बाटली आढळली.  दोघांचीही प्रकृती गंभीर होती. त्यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिला मृत्यू पावल्याचे सांगितले.  तर तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दखल केले. येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या कागदपत्रांवरून दोघांची प्राथमिक ओळख करता आली. युवतीचे नाव सोनी मनीष विनायक असल्याचे समजले. अधिक माहिती घेतली असता सोनी ही विवाहिता असून तिचा पती मनीष याने १० जानेवारी रोजी विरार पोलीस ठाण्यात ती हरवली असल्याची तक्रार दिली असल्याचे समजले. पोलिसांनी आत्महत्येची माहिती मनीष यास दिल्यानंतर तो  कोल्हापूरला येण्यास निघाला. तो येथे रात्री पोहचणार असून त्यानंतर सविस्तर माहिती मिळेल, असे हवालदार महादेव कोळी यांनी  सांगितले.

Story img Loader