|| दयानंद लिपारे
आमदारांच्या घरासमोर भानामती आणि फुटबॉल मैदानात लिंबूने करवीरकर चक्रावले
पुरोगामित्वाची मोहोर राज्यभर उमटवणाऱ्या कोल्हापूरला अंधश्रद्धेचा विळखा पडला आहे. आमदारांच्या घरासमोर भानामती केली जाते तर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फुटबॉलचा सामना रंगला असताना खेळाडूच्या पायमोज्यामधून चक्क लिंबू बाहेर पडते.. अशा एका पाठोपाठ एक घटनांनी करवीरकर चक्रावले आहेत. प्रसिद्धीच्या पल्याड असे अनेक प्रकार घडत असून त्याची वाच्यता होत नाही. यामुळे कोल्हापूरच्या पुरोगामित्वाला जणू आव्हानच मिळाले आहे.
राजकारणाच्या बरोबरीने कोल्हापूरची सामाजिक, सहकार, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असलेले प्रगतिशील शहर अशी ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्य दृष्टय़ा नेतृत्वामुळे कोल्हापुरात सामाजिक सुधारणांचे वारे वाहू लागले. पुरोगामी महाराष्ट्राला वैचारिक आणि कृतिशील आधार याच करवीर नगरीतून मिळाला. आता मात्र हे शहर अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसत आहे. लिंबू-भानामती यांसारखी कलंकछाया येथे दिवसेंदिवस गडद होऊ लागली आहे. फुटबॉलच्या मैदानात खेळाडूंकडे आढळले लिंबू तर आमदार सतेज पाटील या बडय़ा राजकीय नेत्याच्या निवासस्थानासमोरील भानामती या सलग दोन लक्षवेधी घटनांमुळे कोल्हापूरचे पुरोगामित्व झाकोळले गेले आहे.
अमावस्याच्या मध्यरात्री कसबा बावडा येथील माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या ‘यशवंत निवास’ या बंगल्याच्या दारात एका आठवडय़ात दोन वेळा भानामतीचा प्रकार घडला आहे. पांढऱ्या कपडय़ात हळदी-कुंकू लावलेली काळी बाहुली बांधून ती बंगल्याच्या झाडीत ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडत असलेल्या या प्रकारामुळे कोल्हापूर शहारत संतापाची लाट उसळली आहे.
भानामती की राजकीय डावपेच?
आमदार पाटील हे जिल्ह्यतील राजकारणातील बडे प्रस्थ म्हणूनओळखले जाते. त्यांच्या राजकीय ताकदीचा त्रास होऊ नये म्हणून विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी भानामती केल्याचा सूर उमटत आहे. मात्र, या प्रकारामुळे आमदार पाटील हे विचलित झाले नाहीत. त्यांनी हा प्रकार विरोधकांनी केल्याचा आरोप करतानाच आपली राजकीय भूमिकाही स्पष्ट केली. ‘लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे तुम्ही भानामती करा किंवा दुसरे काही पण करा, मला फरक पडत नाही. मी अशा प्रकाराला घाबरत नाही. आमचे कोणाला निवडून आणायचे ते ठरले असल्याने तुम्ही काहीही केले तरी आमच्यावर परिणाम होणार नाही.’ अशा शब्दांत सतेज पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे.
फुटबॉलला लिंबूने लागीरलं
देशात क्रिकेटचे वेड पण कोल्हापूरकरांना फुटबॉलचे अत्याकर्षण. एका आमदाराच्या नावाच्या चषकाचा फुटबॉलचा सामना सुरू होता. स्थानिक संघाचा परदेशी खेळाडू सॅनो पॅटस हा पायमोज्यामध्ये लिंबू घालून खेळत असताना प्रेक्षकांनी त्याला रंगेहात (की रंगेपाय?) पकडले. त्यांनी मैदानावरून ‘लिंबू-लिंबू’ असा कलकलाट करीत पंचांचे लक्ष वेधले. याची दखल घेत या खेळाडूला पंचांनी पिवळे कार्ड दाखवून बाहेर काढले. विदेशी खेळाडू लिंबू घालून खेळतो याचा अर्थ अन्य खेळाडूही असेच करत असणार याची चर्चाही मैदान आणि शहरात रंगणे स्वाभाविक ठरले. ‘कोल्हापूरच्या फुटबॉलला भुताने झपाटले आहे’का असा बोचरा सवाल उपस्थित करून खेळाडूंच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
प्रबोधनाची गरज
फुटबॉल खेळातील लिंबू आणि आमदारांच्या घरासमोरील भानामती या प्रकारामुळे विवेकी जनता अस्वस्थ झाली आहे. हे प्रकार लांच्छनास्पद आहेत, असे मत अंनिसच्या कोल्हापूर जिल्हा महिला संघटक सीमा पाटील यांनी ‘लोकसत्ता’ कडे व्यक्त केले. या घटना उघडकीस आलेल्या असल्या तरी आम्हाला अशा घटना घडत असल्याचे अनेकांकडून वारंवार सांगितले जाते. त्याचे निराकरण करून वैचारिक बदल घडवून आणतो. विज्ञान-तंत्रज्ञान यामुळे भौतिक सुविधा घरोघरी आल्या असल्या तरी अद्याप सामाजिक उन्नतीची मोठी गरज असल्याचे दिसत असून त्यासाठी आमचे काम सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.