कोल्हापूर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर करून त्यांना दिलासा दिला. या निर्णयाचे स्वागत करत कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी छ. शिवाजी चौक येथे साखर वाटप केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना कथित मद्य घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप करून ईडी ने अटक केली होती. गेले दीड महिने ते तिहार जेलमध्ये होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एका विरोधी पक्षाच्या नेत्याला अटक झाल्याने देशभरातून यावर प्रतिक्रिया उमटत होत्या.
हेही वाचा…सूर्यास्ताच्या साक्षीने कोल्हापुरात परशुराम जयंती; पालखी मिरवणूक उत्साहात
ईडीने पीएमएलए (हवाला प्रतिबंधक कायदा) चा गैरवापर करत केजरीवालांना अटक केली होती. या कायद्यानुसार अटक झालेल्या व्यक्तीला सहज जामीन मिळत नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अवघ्या पन्नास दिवसात जामीन देऊन केजरीवालांना दिलासा दिला. लोकशाही धोक्यात येत असताना न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी स्वागतार्ह आहे. देशात इंडिया आघाडीचा विजय होणार असून, लवकरच केजरीवालांना या खोट्या आरोपांमधून निर्दोष सुटतील असा विश्वास आप चे प्रदेश संघटन सचिव संदिप देसाई यांनी व्यक्त केला.