मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केल्याने बंड केलं, असं सातत्याने शिंदे गटातील आमदारांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटातील आमदारांना हिंदुत्वावर मार्गदर्शन करणार आहे. यावरून शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी समाचार घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुषमा अंधारे कोल्हापुरमध्ये महाप्रबोधन यात्रेत शिवसैनिकांना संबोधित करत होत्या. “डोळ्याला पाणी लाऊन म..म म्हणणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. डोळ्यातले पाणी पुसणारे हिंदुत्व आम्हाला हवं आहे, जे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे. कुटुंब संकटात असताना पळून जाणारे आणि स्वार्थ साधणारे लोक, ते हिंदुत्वाची व्याख्या करत असतील तर ती मान्य नाही,” असे सुषमा अंधारेंनी म्हटलं.

हेही वाचा : ठाकरे गट-वंचित युतीच्या चर्चेत CM शिंदेंकडून प्रकाश आंबेडकरांची भेट; पहिली प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री म्हणाले…

“प्रेमाची आणि जोडण्याची भाषाच कळत नसेल, तर देवेंद्र फडणवीस हे मांडत असलेला विघटनवादी विचार हिंदुत्व असूच शकत नाही,” अशी टीका करत सुषमा अंधारे दीपक केसरकरांनाही लक्ष केलं आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर २०१४ ला शिवसेनेत आले. केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. मग ते हे हिंदुत्व शिकले कधी?,” असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare attacks devendra fadnavis and deepak kesarkar over hindutva ssa