ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले अदा न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व शेतकर्यानी मंगळवारी पुन्हा आंदोलनाला हात घालत उसाची वाहतूक करणारी वाहने रोखून धरली. रांगोळी (ता. हातकणंगले) येथे चक्का जाम करत सुमारे २५० हून अधिक वाहने रोखून अडविण्यात आली आहेत. एफआरपीच्या ८० टक्केप्रमाणे दोन हजार रुपये खात्यावर जमा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार स्वाभिमानी संघटनेने केला आहे. ‘एफआरपी’च्या रकमेवरून आंदोलनाची पहिली ठिणगी पडली असून साखर कारखानदार कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
बुधवारी दुपापर्यंत फॉर्मुल्याप्रमाणे कारखानदारांनी दर जाहीर करावा, अन्यथा ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’ने दिला होता. त्यानुसार रांगोळी येथे मंगळवारी रात्रीपासून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच गावातील शेतकऱ्यांनी वाहने रोखण्यास सुरुवात केली. दिवसभरात सुमारे २५० हून अधिक ट्रक व ट्रक्टर-ट्रॉल्या आदी वाहने रोखून धरत ती रांगोळीच्या माळावर लावण्यात आली. या वेळी वाहने रोखण्यावरून शेतकरी व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली.
वाहने रोखल्याची माहिती मिळाल्यानंतर जवाहर साखर कारखान्याचे संचालक विलास गाताडे, विलास खानविलकर व काही अधिकारी रांगोळी येथे आले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून वाहने सोडण्याची विनंती केली. मात्र कार्यकत्रे आपल्या मतावर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. नागपूर येथील बठकीत एफआरपीची रक्कम पहिल्या टप्प्यात ८० टक्के व नंतर २० टक्के द्यावी, असा फॉम्र्युला निश्चित करण्यात आला होता. तो फॉम्र्युला स्वाभिमानी संघटनेने मान्य केला आहे. त्यानुसार एफआरपीची ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक होते. मात्र फॉम्र्युलचे उल्लंघन करीत कारखान्यांनी १७०० रुपयांची पहिली उचल जमा करत निश्चित केलेल्या तोडग्याचे उल्लंघन केले आहे. ८० टक्केनुसार दोन हजार रुपयेप्रमाणे उचल जमा करेपर्यंत हे आंदालन सुरूच राहील असे कार्यकर्त्यांनी सांगितले. या वेळी आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे तालुका संघटक प्रकाश पाटील, शीतल कंठी, ग्रामपंचायत सदस्य पप्पू मगदूम, एम. आर. पाटील, दीप पाटील आदींनी केले.
संघटनेत श्रेयवाद
एफआरपीप्रमाणे बिले मिळण्यासाठी बुधवारपासून तीव्र आंदोलन करण्याची भूमिका संघटनेने जाहीर केली होती. मात्र रांगोळी येथील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारीच आंदोलन केल्याने संघटनेच्या इतर गावातील कार्यकर्त्यांनी येऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी वाद घातला. तसेच ऊस वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या भूमिकेबद्दल आंदोलनस्थळी येऊन नाराजी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा