कोल्हापूर : सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपयश आल्यानंतरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हे लगेचच सक्रिय झाले आहेत. संघटनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी व्यक्त केला आहे. त्याची सुरुवात १ जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाने पुसद (जिल्हा यवतमाळ) येथून केली जाणार आहे. सतत राजकीय भूमिका बदलत जाणाऱ्या शेट्टी यांना शेतकरी, जनतेचे पाठबळ कितपत मिळणार यावर त्यांची राजकीय दिशा अवलंबून असणार आहे.
हेही वाचा >>> शाश्वत विकास परिषदेमधून कोल्हापूरला सर्वसमावेशक वाढीचे मॉडेल म्हणून उदयास येण्यासाठी घोषणापत्राची निर्मिती
पराभवानंतर माझं काही चुकले का, अशी समाज माध्यमात भावनिक पोस्ट करणाऱ्या शेट्टी यांना महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सरूडकर यांच्या पराभवासाठीच तुमची उमेदवारी जाणीवपूर्वक होती का, अशी विचारणा करीत आहेत. राज्य परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा ऊर्जा भरण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मरगळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचे आव्हान शेट्टी यांच्यासमोर असणार आहे. राज्यव्यापी दौरा केल्यानंतर शेतकरी, नागरिक यांची भूमिका समजून घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीची भूमिका स्वाभिमानी कडून स्पष्ट केली जाणार आहे. स्वबळावर लढायचे की महायुती – महाविकास आघाडी यांच्यासोबत जायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कोणासोबत केल्याने लाभ होऊ शकतो याची आखणी या काळामध्ये केली जाणार आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी घेण्याचा निर्धार करणाऱ्या शेट्टी यांचा पुढील प्रवास आव्हानात्मक असणार आहे.