कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गासासाठी भूमी संपादन करताना चौपट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी अंकली टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको करणाऱ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केली. शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

रत्नागिरी नागपूर महामार्गातील चोकाक ते अंकली या बाधित गावातील उदगांव व उमळवाड येथे येत्या १७ व १८ रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मोजणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी उदगाव (ता. शिरोळ) येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी काल केली होती.

शिरोळ तालुक्यातील जैनापुर येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चोकाक ते उदगाव बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावर होणारा मार्ग कसा करावा या मागण्यासाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी उपोषणाला बसले आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज रस्ता रोको आंदोलन सुरू केले.

पोलिसाकडून घरात घुसून कार्यकर्ते ताब्यात घेतले.शेतकरी रानात वैरणीसाठी गेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. तरीही शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. राज्य सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.

हे आंदोलन फक्त बाधित शेतकऱ्यांचे नाही तर महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गातील कृष्णा नदीवरील होणा-या पुलामुळे उमळवाड , कोथळी , सांगली शहर , धामणी , समडोळी कवठेपिराण , सांगलवाडी , हरिपूर , दानोळी , कवठेसार , हिंगणगांव , कुंभोज दुधगांव सावळवाडी माळवाडी ,किणी ते खोची या गावांनाही पुलाच्या भरावामुळे महापुराचा त्रास होणार आहे.

विक्रम पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून सुरू केलेला लढा आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक झाला आहे. विक्रम पाटील यांनी गेल्या तीन दिवसापासून उपोषण सुरू केले असून त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर जिल्ह्यातील शेतकरी उग्र आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आंदोलक यांच्यात धक्काबुक्की झाल्याने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.