कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळ मोडीत काढली आहे. रात्रीच्या अंधारात घडामोडी करीत चळवळ बाजारात विक्रीला नेण्याचे काम त्यांनी केले आहे, अशा परखड शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी तोफ डागली.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून वैभव कांबळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हेही उपस्थित होते. तथापि त्यानंतर झालेल्या घडामोडीमध्ये उल्हास पाटील व डॉ. सुजित मिणचेकर या उद्धव ठाकरे शिवसेनेतील माजी आमदारांनी स्वाभिमानी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर या दोघांनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली.
हेही वाचा : कोल्हापुरात आघाडीत उमेदवारीवरून संघर्षाला निमंत्रण
या प्रकारावर बोलताना हातकणगले राखीव मतदार संघातून निवडणूक लढवणारे वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, माझा अर्ज भरण्यासाठी स्वतः राजू शेट्टी उपस्थित होते. पण रात्रीत अशा काय घडामोडी घडल्या की त्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याची उमेदवारी कापली गेली. एकीकडे शेट्टी लाठीकाठी खाणाऱ्या, तुरुंगात जाणारे कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असे म्हणतात. या निकषांमध्ये आता उमेदवारी दिलेली नेमके कोठे बसतात. गेली वीस वर्षे स्वाभिमानी संघटनेची चळवळ लढत असताना १५ गुन्हे दाखल झाले आहेत. दहा वेळा तुरुंगवास झाला आहे. तरीही प्रामाणिक कार्यकर्त्याची उमेदवारी कापली गेली आहे. राजू शेट्टी यांच्या या कारनाम्यांचा पर्दाफाश लवकरच करणार आहे.