कोल्हापूर : येत्या चार दिवसात मागील गळीत हंगामातील थकीत १०० रूपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अन्यथा कोणत्याही क्षणी साखर अडवण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यांना निवेदनावर देण्यात आला. तसेच एकाही सारखर कारखानदारांना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दत्त, गुरूदत्त, जवाहर, शरद व पंचगंगा साखर कारखान्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
हेही वाचा >>> मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमुळे प्राण वाचलेल्या ‘दुवा’चा वाढदिवस मुख्यमंत्र्यांनी केला साजरा
मागील गळीत हंगामातील थकीत बिलापोटी ४०० रूपये द्या, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे बेंगलोर महामार्ग रोखला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी मध्यस्थी करून मागील गळीत हंगामातील १०० रूपये बिल देण्याचे आपल्या साखर कारखान्याने जाहीर केले होते. सदरची रक्कम दोन महिन्यात शेतकऱ्यांचे खात्यावर वर्ग करू साखर कारखान्यांनी लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही सदरचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट बनलेली आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे देण्यास आपल्या साखर कारखान्याने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करू नये, ठरल्याप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले वर्ग करावीत.
हेही वाचा >>> महाविकास आघाडीत मतभेद मिटण्यावर ‘वंचित’च्या समावेशाचा निर्णय अवलंबून – प्रकाश आंबेडकर
अन्यथा निवडणुकीत आपल्याला तसेच आपल्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला कोणत्याही गावात प्रचारासाठी आम्ही फिरू देणार नाही. तसेच साखर कारखान्यातून बाहेर पडणारी साखर अडवण्यात येईल. व यामधून मोठा संघर्ष निर्माण होईल, याची नोंद घेऊन शेतकऱ्यांची बिले देऊन सहकार्य करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अण्णासो चौगुले, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, राम शिंदे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, राजाराम देसाई, आप्पा ऐडके, शिवाजी आंबेकर, शिवाजी पाटील, संपत पोवार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.