कोल्हापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी अर्जाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांबरोबरच तालुका अधीक्षकांना देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याने एकूणच राज्यभरातील दूर अंतराच्या तालुक्यांतील रूग्णांचा वेळ, पैसा वाचणार असल्याचे सोमवारी सूत्रांनी सांगितले.
राज्य शासनामार्फत प्रत्येक तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या अर्जाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी अधिकार दिले होते. योग्य मार्गदर्शन तत्वे नसल्यामुळे त्यांची स्वाक्षरी होत नव्हती. गडहिंग्लज १०० खाट उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत खोत यांची भेट शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख राम राऊत यांनी आज घेतली.
मार्गदर्शन तत्वाबरोबरच ही सुविधा सुलभ कशी होईल, याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावला. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, आरोग्यदूत फाऊंडेशनचे बाबा देशमाने, भगीरथ तोडकरी, निलेश पाटील आदी उपस्थित होते.