कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या विकासकामाचा ध्यास घेतलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर आरोप करणार्‍या विरोधकांनी इचलकरंजीच्या विकासासाठी काय केले? कोणती योजना आणली? हे पहिल्यांदा स्पष्ट करावे आणि नंतर आमदार आवाडे यांच्या कार्यपध्दतीवर टीका करावी, असा टोला ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते व माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत बोलताना लगावला.

सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी शुक्रवारी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी काही लोकप्रतिनिधींनी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुळकूड योजनेला विरोध केला जात असल्याची टीका केली होती. त्याला ताराराणी पक्षाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

प्रकाश दत्तवाडे यांनी, इचलकरंजीच्या विकासासाठी झटतो म्हणणार्‍यांनी गावाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण त्याऐवजी ते चांगल्या विकासकामांत खोडा घालत आहेत. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून आमदार आवाडे हे पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातून कृष्णा योजना बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. सुळकूड योजना होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहराला सतत पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत असताना विरोधकांची कोल्हेकुई सुरु असल्याचा टोला लगावला.

हेही वाचा >>> राधानगरी मतदारसंघात नव्या समीकरणामुळे उत्सुकता वाढली

माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी, कृती समितीच्या नांवाखाली मविआ कडून पाण्याऐवजी व्यक्तीगत टीका करण्यात धन्यता मानली जात आहे. आमदार आवाडे यांनी विरोध डावलून कृष्णा योजना मार्गी लावल्यामुळेच आज शहराला पाणी मिळत आहे.  ती योजना नसती तर आज पाण्यासाठी वणवण करावी लागली असती. शिवाय ९९ शुध्द पेयजल प्रकल्प शासनाकडून मंजूर करुन आणून त्यासाठी 4 कोटीचा निधीही उपलब्ध करुन दिला आहे. पण महापालिका प्रशासनाकडून ते सुरु करण्यासाठी चालढकल केली जात आहे. त्यामध्ये आमदार आवाडे यांनी काय भ्रष्टाचार केला ते सिध्द करावे. सुळकूड योजनेला आवाडे यांचा कसलाही विरोध नसून ती पूर्णत्वास जाईपर्यंत शहराला पाणी मिळण्यासाठी त्यांनी नवीन 7 जलकुंभ मंजूर करुन आणले आहेत, कृष्णा योजना बळकट केली जात आहे. पण विरोधकांकडून काहीही न करता चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला.

हेही वाचा >>> शक्तिपीठ महामार्ग बाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका अयोग्य; मंत्र्यांना जिल्हा बंदी समन्वय समितीचा इशारा

माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी, सुळकूड योजनेसाठी कृती समिती म्हणजेच मविआ कडून केवळ दिखावूपणा केला जात आहे. विकासकामात येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी विरोध करत आरोप करण्यात मविआ चे नेते मग्न आहेत. पेयजल प्रकल्पाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी महापालिकेने सर्वांना कार्ड द्यावे. आणि त्यासाठी मविआच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत. मविआच्या नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून प्रत्येक कामात केवळ अर्थ व टक्केवारी शोधणारे दुसर्‍यांवर आरोप करत असल्याचा टोला लगावला. यावेळी सतिश मुळीक, नंदू पाटील, श्रीरंग खवरे, नरसिंह पारीक, राहुल घाट, किशोर पाटील, नितेश पोवार, दीपक सुर्वे, संजय केंगार आदी उपस्थित होते.