टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पातून मेरवेवाडी तलावात पाणी सोडून ११ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी आज मंगळवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुर्ली घाटात पशुधनासह ठिय्या मांडून आक्रमक आंदोलन छेडण्यात आले.
मेरवेवाडी तलावात पाणी सोडले नाहीतर सुर्ली घाट (ता. कराड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा देण्यात आलेला इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रत्यक्षात उतरवताना पाण्यासाठी लोकांचा अंत पाहू नका. आणखी तीव्र आंदोलन छेडून न्याय मिळवण्याची धमक निश्चित आमच्यात असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी राज्यकर्त्यांना निक्षून दिला आहे. टेंभूचे पाणी मेरवेवाडी तलावात सोडल्यास मेरवेवाडी, पाचुंद वाघेरी, सुर्ली, कामाथी, करवडी यासह ११ गावांना त्याचा लाभ मिळणार आहे. टेंभू प्रकल्पात पाणी असताना, या ११ गावांची पाण्यासाठीची तळमळ कशासाठी असा संतप्त सवाल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद सदस्य नीलमताई पाटील, हिंदकेसरी मल्ल संतोष वेताळ, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोपाळराव धोकटे यांच्यासह संबंधित गावातील ग्रामस्थांनी आपल्या पशुधनासह ठिय्या मांडून सुर्ली घाट अडवून धरला. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून या पाणीप्रश्नांचा शासनदरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिल्याने हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे, की मेरवेवाडी, पाचुंद, वाघेरी, सुर्ली, कामाथी करवडी यसा गावांना पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने मेरवेवाडी, येथे तलाव बांधण्यात आला. पण दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईमुळे तलावातील पाणी आटले. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनास कळवून टेंभू योजनेतील पाणी तलावात सोडावे अशी मागणी केली. मात्र याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मेरवेवाडीसह संबंधित गावांतील लोकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा व गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्ष कराड तालुक्यातून सांगली जिल्ह्याला जाणाऱ्या टेंभूचे पाणी मेरवेवाडी येथील तलावामध्ये सोडून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
‘टेंभू’तून मेरवेवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी सुर्ली घाटात रास्ता रोको
टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पातून मेरवेवाडी तलावात पाणी सोडून ११ गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी...

First published on: 16-12-2015 at 03:37 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tembhu meravevadi water leave valley animal movement staged