कोल्हापूर : राज्यातील वस्त्रोद्योग उत्पादनांची ‘महा-टेक्स’ नाममुद्रेने वस्त्र उत्पादने विक्रीची सुविधा, सहकारी यंत्रमाग संस्थांच्या अतिरिक्त जमीन विक्रीतील अडचणी दूर करणार, आधुनिकीकरणाच्या प्रस्तावांना शासन साहाय्य अशा म

हत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख करीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी राज्यातील सहकारी वस्त्रोद्योग संस्थाचालक, वस्त्रोद्योजक यांना आश्वस्त केले. पहिल्याच दौऱ्यात मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने वस्त्र उद्योजकांसाठी हा दौरा दिलासादायक ठरला.

नव्या वस्त्रोद्योग धोरणाबतची शासनाची भूमिका आणि वस्त्रोद्योजकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी गुरुवारी कोल्हापूर, इचलकरंजी येथील संस्थांना भेटी दिल्या. वस्त्रोद्योजकांचे प्रश्न समजावून घेतले. त्यांची सकारात्मक देहबोली अडचणीतील वस्त्रोद्योजकांसाठी आश्वासक ठरली.

महा टेक्सचा उदय

महाराष्ट्रात वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग अशी तिन्ही महामंडळे तोट्यात असल्याने त्याचा वस्त्रोद्योजकांना काहीच उपयोग होत नाही. या मुद्द्याला स्पर्श करीत मंत्री सावकारे यांनी तिन्हींचे एकत्रीकरण करून एकच महामंडळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून राज्यातील विविध वस्त्रोद्योग केंद्रातील उत्पादने एका छताखाली आणून त्याची विक्री ‘ महा टेक्स ‘ या नाममुद्रेखाली (ब्रँड ) विक्रीची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले. आदिवासी महामंडळासह अन्य शासकीय आस्थापनांना राज्यात यंत्रमागावर उत्पादित होणारे कापड खरेदी करणे बंधनकारक करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात असल्याचे त्यांनी नमूद केल्यावर वस्त्र उद्योजकांचा हुरूप वाढला.

जमीन विक्री मुभा

राज्यात सहकारी सूतगिरणी, सहकारी यंत्रमाग संस्थांकडे मोठ्या प्रमाणात जमिनी पडून आहेत. त्याचा संस्थांना काहीच वापर होत नाही. अतिरिक्त जमीन विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी संस्थांची मागणी आहे. त्यामध्ये शासकीय पातळीवर तांत्रिक अडचणी येत आहे. त्या दूर करून विक्री केलेल्या जमिनीतून शासकीय देणी, आधुनिकीकरण अशा काही अटी लागू करण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

सौरऊर्जा प्रोत्साहन

सौरऊर्जा हा उद्योगासाठी सध्या परवलीचा शब्द बनला आहे. वस्त्रोद्योजकांनीही सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याची मागणी लावून धरली आहे. हा संदर्भ घेऊन मंत्र्यांनी सौरऊर्जेसाठी शासन अनुदान देतच आहे. पण आता त्याच्याही पुढे जात सौरऊर्जेतील बॅटरीसाठी अनुदान देण्याचा मनोदय व्यक्त केला. याद्वारे ऊर्जा संकलित (स्टोरेज) करता येईल, अशी संकल्पना बोलून दाखवली. वस्त्र उद्योजकांमध्ये आशावाद एकंदरीतच सावकारे यांनी सहकारी वस्त्रोद्योग संस्था, वस्त्रउद्योजक, शिक्षण संस्था, यंत्रमागधारकांच्या संघटना, मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क आदींशी संवाद साधत आश्वासित केल्याने मरगळलेल्या वस्त्र उद्योजकांमध्ये काहीसा आशावाद दिसून आला.