निश्चलनीकरणाचा परिणाम राज्यातील वस्त्रोद्योगावरही मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. कापड व्यापाऱ्यांचा जुन्या नोटांचा आग्रह आणि सूत व्यापाऱ्यांचा मात्र या नोटा घेण्यास नकार या कात्रीत सध्या सामान्य यंत्रमागधारक अडकला आहे. या नोटा स्वीकारून बँकेत भराव्या तर चौकशीचा ससेमिरा मागे लागणार, अशा विचित्र कोंडीत यंत्रमागधारक अडकला आहे. या अर्थभ्रांतीमुळे गोंधळून गेलेल्या यंत्रमागधारकांनी सध्या कापड विणकाम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे यंत्रमागधारकांनी काम थांबवल्याने लाखो यंत्रमाग कामगारांना रोजगारास मुकावे लागले असून त्यांच्या रोजी-रोटीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील अनेक निमशहरी-ग्रामीण भागांत यंत्रमाग उद्योग अधिकतम वसला आहे. देशात उत्पादित होणाऱ्या कापडापकी ६५ टक्के कापड विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमागावर विणले जाते. देशात सुमारे २४ लाख यंत्रमाग असून त्यातील निम्मे राज्यात आहेत. राज्यातील या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संख्या १२ लाखांवर असून ती शेतीखालोखाल आहे.
इतका प्रचंड आवाका असलेला हा उद्योग गेली दोन वष्रे मंदीशी सामना करत आहे. दिवाळीनंतर या उद्योगात रडतखडत काही प्रमाणात नव्याने सौदे झाले खरे, पण त्याचा आनंद आठवडाभरही राहिला नाही. निश्चलनीकरणाच्या निर्णयाने यंत्रमाग उद्योगाचे कंबरडे मोडले. या उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येकाचे स्वरूप भिन्न असल्याने त्याच्याशी मुकाबला करताना यंत्रमागधारक उन्मळून पडला आहे.
कापड व्यापाऱ्यांचे रोखीचे व्यवहार
मंदी असताना कसेबसे कापड सौदे झाले. आता कापड व्यापारी विकलेल्या कापडाला भाव पाडून देत आहेत. खेरीज, त्यांनी जुन्या नोटाच देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याची पोचपावतीही दिली जात नाही. या नोटा न स्वीकारल्यास सौदे रद्द करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला जातो. या नोटा स्वीकारल्या आणि कच्चा माल असलेल्या सूत खरेदीसाठी वापरायच्या झाल्या तर सूत व्यापारी मात्र या नोटा नाकारीत आहेत. धनादेशाद्वारे व्यवहार करा, रोकड चालणार नाही, असे त्यांच्याकडून सुनावले जाते. बरे, या नोटा बँकेतील खात्यावर भरायच्या तर त्याचा तपशील देणे कठीण असते. या तिहेरी कोंडीत यंत्रमागधारकांची आíथक घुसमट झाली आहे, अशा भावना यंत्रमाग जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केल्या.
वाहतुकीला फटका
कापड विक्रीचे व्यवहार रोकड पद्धतीने होऊ लागल्याने विणकाम थांबत चालले आहे. परिणामी, इचलकरंजी येथून राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली, मुंबई येथे होणारी कापडाची वाहतूक मंदावली आहे. येथून रोज ५० ट्रकमधून कापड विक्रीसाठी नेले जात होते, आता हे प्रमाण निम्म्याहून अधिक घटून ४-५ ट्रकवर आले असल्याचे वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष आनंदराव नेमिस्ठे यांचे म्हणणे आहे.
यंत्रमाग बंदचे सावट
यंत्रमाग उद्योग मंदीच्या तडाख्यात सापडला आहे. अशात नोटाबंदीच्या संकटाने तो आणखीच ढेपाळला आहे. याचे परिमाण या क्षेत्रावर दिसू लागले आहेत. नोटाबंदीने कापड विणकाम मोठय़ा प्रमाणात घटले आहे. लाखो मीटर कापड पडून राहिले असून त्यात यंत्रमागधारकांचे कोटय़वधी रुपये अडकून पडल्याने अर्थकोंडी निर्माण झाली आहे. यामुळे त्रस्त झालेल्या सर्वपक्षीय यंत्रमागधारक संघटनांनी याप्रश्नी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. – सतीश कोष्टी, अध्यक्ष, इचलकरंजी यंत्रमागधारक सहकारी संघटना