मंदीवर मात करण्यासाठी उपाययोजना
वस्त्रोद्योगात आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस २४ तास यंत्रमाग कारखाने बंद ठेवणे, सर्व कापडांच्या विक्रीची देयके मिळण्याचा कालावधी एकच ठेवणे, कापडाला ताग्यावर आधारित दलाली ठरविणे, असे महत्त्वपूर्ण निर्णय इचलकरंजी येथे झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घेण्यात आले. अध्यक्षस्थानी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन होते.
वस्त्रोद्योगात सध्या असलेल्या मंदीच्या पाश्र्वभूमीवर येथील यंत्रमागधारक जागृती संघटनेच्यावतीने इचलकरंजी शहरातील विविध भागात यंत्रमागधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानुसार एकत्रित निर्णय घेण्यासाठी यंत्रमागधारकांचा मेळावा झाला.
वस्त्रोद्योगातील मंदीवर मात करण्यासाठी आजी-माजी आमदार व खासदार यांनी पुढे यावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. सभेत सूरज दुबे, भानुदास वीर, अशोक बुगड, महेश दुधाणे, सचिन मांगलेकर, बजरंग जाधव, रघुनाथ जमादार आदींची भाषणे झाली. यंत्रमाग व्यवसायाला सॅनव्हॅट कर लागू करावा, कापसाचा जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश करावा, तसेच सुतावर दर छापावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी लढा देण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा