कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये टेक्निकल टेक्स्टाईल उद्योगात गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहे. शासनाकडे अभिरुची अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट) सादर होत आहेत. राज्यात सहा ठिकाणी टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभे करण्यात येणार आहेत, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. राज्याचे नवे वस्त्रोद्योग धोरण, शंभर दिवसांची कामगिरी या अनुषंगाने त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

सध्या वस्त्रोद्योगामध्ये टेक्निकल टेक्स्टाईलचा बोलबाला सुरू आहे. परिधान करावयाच्या वस्त्रांशिवाय नानाविध कारणांसाठी उत्पादित होणाऱ्या कपड्यांना टेक्निकल टेक्स्टाईल असे संबोधले जाते. जिओ टेक्स, ॲग्री टेक्स, मेडि टेक्स, स्पोर्ट टेक्स असे त्याचे विविध प्रकार आहेत. जगभरात वस्त्र उद्योगातील मूल्यवर्धिततेचा खरा लाभ टेक्निकल टेक्स्टाईलमधून मिळत असतो. त्यामुळे अशाप्रकारचे उद्योग राज्यात सुरू व्हावे, यासाठी वस्त्रोद्योग धोरणात त्याचा अवलंब केला आहे. राज्यात या उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे. या अनुषंगाने राज्याची कामगिरी विशद करताना मंत्री सावकारे म्हणाले, केंद्र शासनाने टेक्निकल टेक्स्टाईल उद्योग वाढीसाठी स्वतंत्र अभियान हाती घेतले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही असे उद्योग राज्यांमध्ये वाढीस लागावे अशी भूमिका घेतली आहे. टेक्निकल टेक्स्टाईल वाढीसाठी स्वतंत्र भूमिका घेऊन नियोजन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. याकरिता वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली असून, प्रस्तावांची छाननी करण्यात येणार आहे आहे. औरंगाबाद येथे टेक्निकल टेक्स्टाईल सुरू करण्यासंदर्भात पहिला अभिरुची अभिव्यक्ती प्रस्ताव (एक्स्प्रेस ऑफ इंटरेस्ट) सादर झाला आहे. राज्यात सहा ठिकाणी टेक्निकल टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यासंदर्भात संबंधितांशी बोलणी सुरू आहे.

राज्य शासनाने नवे वस्त्रोद्योग धोरण स्वीकारताना २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल, असे गृहीत धरले आहे. तथापि राज्यांमध्ये नव्याने वस्त्रोद्योग प्रकल्प येण्याचे प्रकल्प येण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. यामध्येच प्रीमियर मित्र ( पीएम) पार्क उभे केले जाणार आहेत. त्यामध्ये मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. एकंदरीत प्रतिसाद पाहता २५ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा टप्पा राज्य ओलांडेल, असा विश्वास वाटतो, असे मंत्री सावकारे यांनी नमूद केले.

शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने भरीव कामगिरी केली आहे. वस्त्रोद्योगात सौर ऊर्जा वाढीस लागावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. वस्त्रउद्योग घटकांमध्ये सौर ऊर्जा वाढीस लागण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शिवाय, सौर ऊर्जा प्रकल्पातील बॅटरीसाठीही अनुदान दिले जाणार आहे. या माध्यमातून ऊर्जा संकलित (स्टोरेज) करण्याची सुविधा उद्योजकांना मिळणार आहे, याकडेही मंत्री सावकारे यांनी लक्ष वेधले.