कितीही संकटे आणली तरी घाबरणार नाही. मरण पत्करण्याची वेळ आली तरी चालेल पण पक्ष सोडणार नाही. ही वाघांची सेना आहे. माझ्यासमोर बसलेले सर्व वाघ आहेत. वाघाची कातडी पांघरलेले गद्दार निघून गेलेत, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केली.
हेही वाचा >>> कोल्हापूर : सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या पाठीत काठी – राजू शेट्टी
गडहिंग्लज येथे शिवसंवाद यात्रेत बोलत होते. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केले. राऊत म्हणाले, या गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवून गद्दारांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी लोकगर्जना चांद्यापासून बांद्यापर्यंत झाली पाहिजेत. २०२४ ला सर्वांचा हिशोब चुकता करू. गद्दारांनी आम्हाला धडे देऊ नयेत. येणाऱ्या काळात गद्दाराच्या राजकीय अंतयात्रा निघणार आहेत. सत्य काय आहे ते २०२४ ला दाखवू हा संदेश महाराष्ट्राला कोल्हापूरकरांचा पोहोचला पाहिजेत. झडलेल्या झाडाची फुले पडली आहेत. आता नव्याने पुन्हा पालवी येऊन फुले डोलणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा >>> कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेस सात तास उशिरा; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया
अमित शहा यांनी कोल्हापुरात निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून आयोगाने सत्याच्या बाजूने निर्णय दिला, असे विधान केले होते. त्यावरून राऊत यांनी सत्य काय आहे २०२४ साली समजेल. दिल्लीत आणि महाराष्ट्रातही आमचे राज्य असेल, असे प्रतीत्तुर दिले. संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील गद्दारी करून खोके घेतले व पाठीत खंजीर खुपसले त्यांचा निवडणुकीत समाचार घेतला जाईल. माजी आमदार संजय घाटगे, चंदगड संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे उपस्थित होते.