कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती म्हणजे कोल्हापूरची अस्मिता आहे. त्यांची उमेदवारी ही रयतेची उमेदवारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज त्यांचे लाखो प्रवक्‍ते तयार झाले आहेत. हे लाखो प्रवक्‍ते सध्याच्या खासदारांना पेलवणारे, परवडणारे नाहीत. तेच मंडलिकांचा येत्या लोकसभा निवडणुकीत पराभव करतील आणि शाहू छत्रपतींना लाखो मताने दिल्‍लीला पाठवतील, असा पलटवार शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यातील विविध गावात शनिवारी प्रचार दौरे झाले. यावेळी बोलताना शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख देवणे यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी सतेज पाटील यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत जोरदार प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा…प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी

उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांसाठी लागणार्‍या औजारांवरील १८ टक्के जीएसटी रद्द करणार असून चुकीची अग्‍नीवीर भरती पद्धत बदलण्याला प्राधान्य दिले जाईल. याशिवाय तरूणांच्या हाताला काम आणि शेतकर्‍यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी नवे सरकार सुधारीत धोरण राबवेल.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर म्हणाले, एकीकडे अनेकांना उमेदवारी मिळविण्यासाठी दिल्‍ली दरबारी तळ ठोकून बसावे लागत असून कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींना मात्र महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान केला आहे. त्यांनी न मागता त्यांना उमेदवारी दिली असून आता त्यांनी न मागता आपण लाखांनी मते देऊन त्यांचा आणखी सन्मान करूया. आमचे सन्मानित राजे कोल्हापूरचाही दिल्‍ली दरबारी मानसन्मान वाढवतील.

हेही वाचा…संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा

सरपंच संदीप पाटील यांनी स्वागत केले. बाजीराव चौगले यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचीही भाषणे झाली.

आजच्या प्रचार दौर्‍याची सुरूवात आमजाई व्हरवडे येथील प्रचार सभेने झाली. त्यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले, शिक्षणविरोधी धोरण राबविणारे भाजपाचे सरकार हे सरकारी शाळा बंद पाडून खासगीकरणाला प्राधान्य देत आहे. असल्या दंगलखोर, जातीवादी सरकारला हटविण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी विचारांचा वारसा जपणार्‍या शाहू छत्रपती यांना आपले सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊया.

हेही वाचा…“मंत्रिपद गेलं, गाड्या गेल्या, उरलो एकटाच!”, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली सत्तांतराची खंत

प्रचार दौर्‍यात गुडाळ, तारळे खुर्द येथेही जाहीर सभा झाल्या. या सर्व सभांना प्रचंड गर्दी करीत कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.या दौर्‍यात विविध ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, दयानंद कांबळे आदींची भाषणे झाली.

भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी उपाध्यक्ष पी. डी. धुंदरे, विश्‍वनाथ पाटील, संचालक दत्तात्रय पाटील, रवींद्र पाटील, आदी उपस्थित होते.

हेही वाचा…छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका

गद्दार आणि खुद्दार

खासदार संजय मंडलिक यांच्यावर तोफ डागताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, या महाराष्ट्रात कुणी कुणाशी गद्दारी केली आणि खरोखर खुद्दार कोण आहेत हे सर्वसामान्य जनतेला माहीत असून गद्दारी आणि खुद्दारी मधला फरक ही जनता मतदानातून दाखवून देईल.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray shiv sena s vijay devane said lakhs of kolhapur public are spokespersons for shahu maharaj they will defeat sanjay mandlik psg