कोल्हापूर : केंद्र सरकारने बुधवारी आगामी २०२३-२४ या ऊस गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी (वाजवी आणि लाभदायक किंमत) मध्ये प्रति क्विंटल १० रुपये वाढ केली आहे. आता प्रतिक्विंटल ३१५ म्हणजे प्रति टन ३१५० रुपये असा दर मिळणार असल्याने ऊस उत्पादकांना हा दिलासा ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक झाली. त्यामध्ये आगामी उस गळीत हंगामासाठी ‘एफआरपी’ला मंजुरी देण्यात आली. माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.
५ कोटी लाभार्थी
पंतप्रधान नेहमीच अन्नदाता शेतकऱ्यांसोबत असतात. सरकारने शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे. एफआरपीतील वाढ हा त्याचाच भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक, साखर कारखाने आणि ५ लाख कामगारांना होणार असल्याचा दावा ठाकूर यांनी केला आहे.
१० वर्षात हजारावर दरवाढ
केंद्रशासन उसाच्या एफआरपी मध्ये सातत्याने वाढ करत आहे. सन २०१३-१४ या हंगामात प्रति टन २१०० रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. २०१७-१८ या हंगामात २५०० रुपये मिळू लागले. तर आता आगामी हंगामात ३१५० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहेत.